जळगाव: पिंप्राळा परिसरात शनिवारी, दुपारी तलाठी कार्यालयामागील एका अपार्टमेंटमध्ये हाय प्रोफाईल कुंटणखाना चालविणारी महिला ही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका विभागाची जिल्हाध्यक्ष असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ही माहिती मिळताच संंबंधित सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्यांनी चक्क कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही राजकीय पदाधिकार्यांचा सहभाग आहे की काय? या दृष्टीने पोलीस चौकशी करत आहेत.
पिंप्राळा येथे भरवस्तीत अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर शनिवारी दुपारी पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यासह पथकाने छापा टाकून कुंटणखाना चालविणार्या महिलेसह 3 महिला, 2 मुली व 3 ग्राहकांना ताब्यात घेतले. या घटनेने पिंप्राळा परिसरात मोठी खळबळ उडाली. भरवस्तीत असलेल्या अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या या प्रकाराविषयीची माहिती उघड होताच अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या प्रकरणाविषयी काही धक्कादायक माहिती आता समोर येऊ लागली आहे.
कुंटणखाना चालविणार्या महिलेचा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वावर
समाजसेवी संस्था असल्याच्या नावावर फ्लॅट भाडेतत्वावर घेऊन कुंटणखाना चालविणारी महिला ही राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका विभागाची जिल्हाध्यक्ष असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या काही महिन्यात सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये, आंदोलनांमध्ये कुंटणखाना चालविणार्या या महिलेचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे या सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तसेच या विषयीची खमंग चर्चादेखील आता रंगू लागली आहे. सत्ताधारी पक्षातील पदाधिकार्यांनी याविषयीची माहिती मिळताच मात्र, त्यांनी कानावर हात ठेवले आहेत. असे जरी असले तरी या प्रकरणात आणखी काही बड्या राजकीय हस्तींचाही यात समावेश आहे की, काय? या दृष्टीनेही तपास करणे गरजेचे आहे.
कुंटणखान्यात दोन विद्यार्थिनी
पदाधिकारी महिलेने भाडेतत्वावर पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीत भाड्याने घर घेतले होते. याच घरावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी घरात 2 तरुणी, 3 महिलांसह 3 ग्राहक पथकाला मिळून आले होते. अटकेतील संशयितांना रविवारी, न्यायालयात हजर केले असता कुंटणखाना मालकीणीची कारागृहात रवानगी करण्यात आली तर पीडित मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पीडित पाच जणांमध्ये दोन विद्यार्थिनी, एक गरोदर महिला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एकमेकांकडे पाहिले जात आहे संशयाने
जळगाव शहरात झालेल्या या कारवाईत राजकीय पक्षाच्या पदाधिकार्याचा सहभाग असल्यामुळे या सत्ताधारी पक्षातील पदाधिकारी आता एकमेकांकडेच संशयाने पाहू लागले आहेत. या महिलेचे पक्षातील इतर काहींशी निकटचे ‘संबंध’ असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, या प्रकरणात प्रमुख संशयित असलेल्या या महिला पदाधिकार्यावर सत्ताधारी पक्षाकडून काय कारवाई होते? याकडे लक्ष लागून आहे.
महिलेकडून ‘सेटलमेंट’साठी जोरदार प्रयत्न
सत्ताधारी पक्षाची जी महिला पदाधिकारी कुंटणखाना चालवत होती ती आता हे प्रकरण दडपण्यासाठी आर्थिक स्वरूपात ‘सेटलमेंट’साठी जोरदार प्रयत्न करत असल्याचे कळते. मात्र पोलीस उपअधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांची कारवाई असल्याने या महिलेचे सर्व प्रयत्न असफल ठरले आहेत. रात्री उशिरा या प्रकरणी रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन विद्यार्थिनींसह एका गरोदर महिलेकडून वेश्या व्यवसाय
महिलेने भाडेतत्वावर पिंप्राळ्यातील सेंट्रल बँक कॉलनीत भाड्याने घर घेतले होते. याच घरावर सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापु रोहम यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला होता. घरात 2 तरुणी 3 महिलांसह 3 ग्राहक पथकाला मिळून आले होते. अटकेतील संशयीतांना आज न्यायालयात हजर केले असता कुटंणखाना मालकीणीची कारागृहात रवानगी करण्यात आली असून पिडीत मुलींना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पिडीत पाच जणांमध्ये दोन विद्यार्थीनी, एक गरोदर महिला असल्याची धक्कादायक बाक समोर आली आहे.
डीवायएसपींनी केली होती कारवाई
सहाय्यक अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांना शहरातील पिंप्राळा परिसरात भवानी मंदिराजवळ सेंट्रलबँक कॉलनीत हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने कुंटणखाना मालकिणीसह पाच तरुणी, दोन ग्राहक वेगवेगळ्या खोल्यांमध्ये मिळून आल्यावर त्यांची अंगझडती घेत रितसर पंचासमक्ष त्यांना अटक करण्यात आली होती. पिडीत मुलींसह संशयित महिलेला रविवाारी न्या. डी.बी. साठे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यात महिलेची न्यायालयीन कोठडीत तर पीडित मुलींना आशादीप महिला वसतिगृहात रवाना करण्यात आले आहे. सरकार पक्षातर्फे अॅड. रंजना पाटील, आरोपीतर्फे केदार भुसारी यांनी काम पाहिले.
अनेक मोठ्या धेंड्यांचा शोध
पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी या ठिकाणी तीन आंबटशौकीन ग्राहक तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. कारवाई दरम्यान पोलिसांना संबंधित महिलेकडून 18 हजारांच्या रोकडसह आठ मोबाईल व संपर्क क्रमांकांची डायरी जप्त केली. दरम्यान वेश्या व्यवसाय करणार्या पिडीतांमध्ये दोन विद्यार्थीनी तर एक मुलगी पं.बंगालमधील तर एक महिला गरोदर असल्याची धक्कादायक बाब चौकशीत समोर आली आहे. यात प्रकरणार अनेक मोठे धेंडही बिधनास्तपणे कुंटनाखाना चालविणार्या महिलेच्या संपर्कात असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.