A youth in Jalgaon died due to drowning during Ganesh immersion जळगाव : जामनेरसह चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे गणेश भक्ताचा श्री विसर्जनादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना जळगावच्या समता नगरातील भगवान नामदेव राठोड (18, समता नगर, जळगाव) या तरुणाचाही कांताई बंधार्यात श्री विसर्जनादरम्यान बुडाल्याने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण बुडाला
भगवान राठोड हा आपल्या आई व मोठा भाऊ यांच्यासोबत समता नगरात वास्तव्यास होता. भावासोबत बांधकामाचे स्टाईल बसविण्याचे काम करत होता. शुक्रवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास समता नगरातील गणेश मंडळाच्या गणपती विसर्जनासाठी मंडळाच्या तरूणांसोबत गिरणा नदीवरील कांताई बंधारा येथे गेला असता तरूणासांबत भगवान पाण्यात उतरला मात्र पाण्याचा अंदाज न असल्याने वाहत्या पाण्यात पाय घसरून पडला. यावेळी उपस्थित तरूणांनी आरडा ओरड केली परंतू तोपर्यंत त्याचा बुडून मृत्यू झाला.
नातेवाईकांनी फोडला टाहो
भगवान यास पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. तरुणाच्या पश्चात आई, मोठा भाऊ विष्णू, दोन विवाहित बहिण असा परीवार आहे.