जळगावातील तिघां भावंडाचे अपहरणाचा प्रयत्न ; भुसावळचा तरुण ताब्यात

0

एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने तरुण जाळ्यात ; चॉकलेट, खेळणे तसेच वॉटरपार्क दाखविण्याचे आमिष

जळगाव- रेल्वे स्थानकावर भीक मागणार्‍या तांबापुर्‍यातील तीन अल्पवयीन सख्या भावंडांच्या अपहरणाचा प्रयत्न एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी हाणून पाडला. मुलांना पळविणार्‍या अवधेश उदीत नारायण शर्मा वय 30 रा.शांतीनगर भुसावळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरुणाने मुलांना टेडीबिअरचे घेवून चॉकलेट तसेच वॉटरपार्कला घेवून जाण्याचे आमिष दाखवून पळविण्याचा प्रयत्न केल्याचे चौकशीतून समोर आले आहे.

तांबापुरा परिसरातील गौतम नगरातील सानिया विनोद चव्हाण वय 12, दानिश विनोद चव्हाण वय 10 व समीर विनोद चव्हाण वय 08 हे तीनही 31 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे रेल्वे स्थानकावर भीख मागण्यासाठी गेले होते. यादरम्यान संशयित अवधेश उदीत नारायण शर्मा याने भीख मागणार्‍या तिघां भावंडांना खेळणे घेवून देण्यासह वॉटर पार्क फिरविणे व चॉकलेट देईल असे आमिष दाखविले. व सानियासह तिच्या दोघा भावंडांना सोबत घेतले. तिघांना रेल्वेतून मनमाड, तसेच भुसावळपर्यंत फिरविले.

जळगाव रेल्वे स्थानकावरुन घेतले ताब्यात
दरम्यान 31 रोजी दुपारी 1 वाजेपासून तीनही मुले घरी न आल्याने कुटुंबिय चिंतेत होते. त्यांच्याकडून शोधही सुरु होता. त्यानुसार काही जण शुक्रवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहचले. गुन्हा दाखल करत असताना तीनही मुले रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रामकृष्ण पाटील, होमगार्ड पंकज भापकर, प्रशांत शिंदे, होमगार्ड वंदना मिस्तरी यांच्यासह रेल्वे स्थानक गाठले. तेथून मुलांसह त्यांच्या अपहरणाच्या प्रयत्नातील संशयित अवधेश शर्मा यास ताब्यात घेतले.

मुलबाळ होत नसल्याने कृत्य केल्याची कबूली
एमआयडीसी पोलिसांनी संशयित अवधेश याची चौकशी केली असता, त्याने लग्न होवून आठ वर्ष झाले तरी मुल बाळ नाही. त्यामुळे हे कृत्य केल्याची कबूली दिली. एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तो जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला आहे.

संशयिताने डोक्यावर लावले होते विग
संशयिताला पाहताच संताप अनावर झालेल्या मुलीच्या आईने तसेच आजीसह कुटुंबियांनी संशयिताला बेदम चोप दिला. या हाणामारीत संशयिताच्या डोक्यावरील विग मुलांच्या कुटुंबियांच्या हातात आले. त्यानंतर कुटुंबियांचा संताप आणनखीच अनावर झाला. वेळीच एमआयडीसी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अन्यथा दुर्घटना घडली असती. दरम्यान संशयिताकडून त्याच्याकडे नवीन खरेदी केलेले टेडीबिअरही मिळून आले.