जळगाव : शहरात दुचाकी चोरट्यांनी उच्छाद मांडला असताना त्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. विविध भागातून चोरट्यांनी तब्बल तीन दुचाकींची चोरी केल्याने दुचाकीधारकांमध्ये भीती पसरली आहे. या प्रकरणी संबंधित ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
विठ्ठल पेठ भागातून दुचाकी चोरीला
सुनील अशोक शेकोकर (37, डीएनसी कॉलेजजवळ, ओम नगर, जळगाव) हे खाजगी व्यावसायीक असून त्यांचे विठ्ठलपेठेत रीपेअरींगचे दुकान आहे. त्यांनी त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच.19 ए.सी. 2848) शुक्रवार, 10 जून रोजी रात्री त्यांनी विठ्ठल पेठेतील गणेश रेफ्रिजरेटर दुकानासमोर पार्क केली.. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 10 हजार रुपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली. मंगळवारी शनीपेठ पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार परीष जाधव करीत आहे.
दर्शन कॉलनीतून दुचाकी लांबविली
राष्ट्रीय महामार्गावरील दर्शन कॉलनीत मध्यरात्री घरासमोर पार्किंगला लावलेली 20 हजार रुपये किंमतीचे दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवली. किसन मोजीलाल पवार (26, हायवे दर्शन कॉलनी, जळगाव) ह खाजगी नोकरदार असून सोमवार, 13 जून रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरासमोर लावलेली 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 सी.जी.5949) अज्ञात चोरट्यांनी लांबवली. मंगळवारी अज्ञात चोरट्यांविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गुलाब माळी करीत आहे.
भाऊंच्या उद्यानासमोरून दुचाकी चोरीला
काव्य रत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोरून अज्ञात चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. सुनील गोपाल वर्मा (47, बुनकार वाडा, पांझरापोळ, पाण्याच्या टाकीजवळ, विठ्ठल पेठ, जळगाव) हे सोनारकाम करतात. शनिवार, 11 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुनील वर्मा हे दुचाकी (एम.एच. 19 ए.व्ही. 5619) ने काव्यरत्नावली चौकातील भाऊंच्या उद्यानासमोर आले व त्यांनी दुचाकी पार्क केली. रात्री आठ वाजता परत असल्यानंतर त्यांना दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्या अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे करीत आहे.