जळगावातील दोघे तरुण अपघातात ठार

जळगाव : माहेरी गेलेल्या पत्नीला भेटून जळगावकडे परतणार्‍या तरुणाच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोघे तरुण ठार झाल्याची घटना वाजता जळगाव-भुसावळ महामार्गावरील दूरदर्शन टॉवरसमोर शनिवारी रात्री पावणेआठ वाजता घडली. महामार्गावर अपघात नित्याचे झाले असून अरुंद रस्त्यांचा प्रश्न सोडवण्याची अपेक्षा होत आहे. आमीर जाकीर खाटीक (वय 24, रा.उस्मानिया पार्क) व परवेज निसार खाटीक (23, रा.लक्ष्मीनगर, कानळदारोड) अशी मयतांची नावे आहेत.

पत्नीची भेट ठरली अखेरची
आमीरचे ममुराबाद रस्त्यावर ऑटो पार्टसचे दुकान व गॅरेज आहे. तर परवेज भाजीपाला विक्री करतो. गेल्या महिन्यात परवेजचे लग्न बर्‍हाणपूर येथील तरुणीशी झाले होते. लग्नानंतर पत्नी माहेरी गेल्याने शनिवारी सकाळी परवेज मामेभाऊ आमीर याला घेऊन दुचाकी (एम.एच.19 सी.एच.6059) ने बर्‍हाणपूर येथे गेले होते. पत्नीला भेटल्यानंतर परवेज व त्याचा मामेभाऊ हे दोघे जण जळगावकडे निघाले मात्र शनिवारी रात्री 7.45 वाजता दूरदर्शन टॉवरजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. त्यात आमीरचा जागीच मृत्यू झाला. तर परवेजचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. 20 मिनिटे दोघेजण रक्तबंबाळ अवस्थेत महामार्गावर पडून होते. काही वाहनचालकांनी मदत करून त्यांना रुग्णालयात हलवले.