जळगाव : हैद्राबाद येथील के. एल. विद्यापीठात हल्ली प्राध्यापक असलेल्या व जळगावातील मूळ रहिवासी असलेल्या प्राध्यापकाची परदेशात नोकरी लावून देण्याच्या आमिषाने सुमारे 11 लाखात फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनोळखी क्रमांकावरून विश्वास संपादन करीत फसवणूक
कांतीलाल पितांबर राणे ( 49, रा.प्रियदर्शनी अपार्टमेंट, एम.जे.कॉलेज परीसर) हे हैद्राबाद येथील के.एल.विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नोकरीस आहेत. 14 सप्टेंबर 2021 रोजी त्यांना एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरुन फोन आला. आम्ही प्लेसमेंटचे काम करतो, जगभरातील विविध देशांमध्ये असलेल्या नामांकीत विद्यापीठांमध्ये आम्ही नोकरी मिळवून देऊ शकतो, असे सांगितले. राणे यांनादेखील परदेशात नोकरी करायची इच्छा असल्यामुळे त्यांनी त्या व्यक्तीस प्रतिसाद दिला. सिंगापूर विद्यापीठात नोकरी मिळवण्यासाठी लागणार्या कागदपत्रांची पुर्तता करण्याच्या बहाण्याने या अनोळखी व्यक्तींनी राणेंकडून वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने 29 जुलै 2022 पर्यंत वेळोवेळी पैसे तब्बल 10 लाख 87 हजार 488 रुपये दिले. यानंतरही राणे यांच्याकडे पैशांची मागणी सुरूच होती. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच राणे यांनी दिलेले पैसे परत मागितले मात्र ते न मिळाल्याने प्रतिसाद मिळणे बंद झाल्यानंतर राणे यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.