जळगावातील रीक्षा चालक तरुणाचा खून : आरोपीला पोलिस कोठडीची हवा

जळगाव : रीक्षा चालक तरुणाचा हरीविठ्ठल नगरात कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर (पाटील, रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव) याला अटक करण्यात आल्यानंतर रविवार, 24 जुलै रोजी न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

जुन्या वादातून केली हत्या
हरीविठ्ठल नगर परीसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परीसरातील दिनेश काशीनाथ भोई (28, हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा तरूण जेवण करून त्याच्या घराच्या ओट्याजवळ शनिवार, 23 जुलै रोजी रात्री 8.30 च्या सुमारास उभा होता. त्यावेळी विठ्ठल उर्फ माऊली तुकाराम हटकर (पाटील) हा दुचाकीवर येवू दिनेशजवळ आला आणि अचानक कंबरेला असलेला कोयत्याने सपासप वार करून त्याने दिनेशची हत्या करीत पळ काढला होता.

खुनानंतर काही वेळेत आरोपीला अटक
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिनेशला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. काही वेळानंतर संशयित आरोपी विठ्ठल उर्फ माऊल तुकाराम हटकर याला पोलिसांनी अटक केली होती. आरोपीविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, संशयित आरोपी विठ्ठल हटकर याला रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.