जळगावातील लाचखोर शिपायाची जामिनावर सुटका
लाच प्रकरणात अधिकार्यांची चौकशी होणार : दोषी आढळल्यास होणार कारवाई
जळगाव : कंत्राटी पदावर सुरक्षा रक्षकाची नोकरी मिळवून देण्यासाठी दोन लाख 10 हजारांची मागणी करून त्यातील पहिला 30 हजारांचा हप्ता स्वीकारताना जळगाव सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील शिपाई गोपाळ कडू चौधरी (55, रा.जुना खेडी रोड, डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) यास जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली होती. संशयीतास सुरूवातीला एका दिवसांची पोलिस सुनावण्यात आली होती तर बुधवारी संशयीताला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता 25 हजारांच्या पी.आर.बॉण्डवर त्याची सुटका (जामीन मंजूर) करण्यात आली.
लाच प्रकरणात अधिकार्यांची होणार चौकशी
जळगाव तालुक्यातील 35 वर्षीय सुशिक्षीत बेरोजगाराने जळगाव जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, जळगाव कार्यालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात कंत्राटी सुरक्षा रक्षक पदावर नोकरी मिळण्यासाठी अर्ज केला होता. सुरक्षा रक्षक पदावर नोकरी लावून ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात आरोपी शिपाई गोपाळ कडू चौधरी याने सोमवारी दोन लाख 10 हजारांची मागणी केली व त्यातील 30 हजारांची रक्कम सोमवारीच पहिला हप्ता म्हणून तक्रारदाराकडून स्वीकारताना एसीबीने मुसक्या आवळल्या होत्या. आरोपीला कोठडी सुनावण्यात आल्यानंतर एसीबी आरोपी सखोल चौकशी केली असून त्यात काही अधिकार्यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. संबंधिताची चौकशी होणार असून त्यात ते दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एसीबी उपअधीक्षक शशीकांत पाटील म्हणाले. दरम्यान, संशयीत आरोपी गोपाळ चौधरी यास आठवड्यातून दोन दिवस जळगाव एसीबी कार्यालयात सकाळी 11 ते दोन या वेळेत चौकशीकामी हजेरी द्यावी लागणार आहे. बुधवारी 25 हजारांच्या पी.आर.बॉण्डवर संशयीताला जामीन मंजूर करण्यात आला.