जळगाव : शासकीय कंत्राटदाराकडे कामे देण्याची मागणी करून प्रत्यक्षात चौघांनी रक्कम घेवूनही कामे न केल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर चौघांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कामे देण्याच्या नावाखाली फसवणूक
लालसिंग हिलालसिंग पाटील (70, रा.जयनगर, जळगाव) हे शासकीय कंत्राटदार असून त्यांची एल.एच.पाटील कन्स्ट्रक्शन प्रा.लि. नावाची फर्म आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता नाना उखा बोरसे यांच्या अधिपत्याखाली ते कामे घेत असत व 10 जानेवारी 2017 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता बसवराज शिवराज पांढरे यांच्या शासकीय निवासस्थानी अक्षय ओंकार चोपडे (रा.पुणे), नाना बोरसे हे काम करीत असल्याने त्यांनी लालसिंग पाटील यांना बोलावून घेतले. तेथे अक्षय चोपडे या मक्तेदाराची गॅ्रव्हीटी ग्रुप नावाने त्यांची कंपनी असून त्यांना जिल्ह्यातील 25 ते 30 लाख रुपयांपर्यंतची कामे त्यांना द्यावीत, अशी विनंती नाना बोरसे यांनी लालसिंग पाटील यांना केली. त्यानुसार लालसिंग पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या शिरसोली व नागदुली शिवारातील शेताच्या शेडचे बांधकाम करण्याचे काम अक्षय चोपडे यांना दिले. त्यापोटी 13 लाख 78 हजार रुपयांचा धनादेशही दिला. पैसे दिल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली नाही म्हणून लालासिंग पाटील यांनी फोन करुन विचारपूस केली. त्यावेळी अक्षय चोपडे यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा
याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लालासिंग पाटील यांनी गुरुवार, 9 जून रोजी दुपारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार नाना उखा बोरसे, अक्षय ओंकार चोपडे, दीपक गंगाराम लांघी व सुयेश गजानन तिटकरे या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुरूवातीला दिलेले 13 लाख 78 हजार रुपये, शासकीय नियमानुसार त्यावरील व्याज व शेडच्या कामाची आजची किंमत अशी एकूण सुमारे 40 ते 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.