अरुण नलावडेंनी साधला पत्रकारांशी सुसंवाद; नाट्यचळवळीबद्दल व्यक्त केला आशावाद
जळगाव । जिल्हा हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो असे असतांनाही जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळ ही उल्लेखनीय आहे. ही चळवळ अशीच टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. जळगाव येथे नाट्यगृह नसल्याने सांस्कृतिक चळवळ शिथील झाली होती. मात्र सध्या नाट्यगृहाचे काम सुरु असल्याने पुन्हा सांस्कृतिक चळवळीला जोर येईल असा विश्वास महाराष्ट्र राज्य सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष अभिनेता अरुण नलावडे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. पुुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या समारोपासाठी ते सोमवारी १८ रोजी शहरात आले होते.
नाट्य लिखाणाबाबत होणार चर्चा
अलीकडच्या कालखंडात नाटकात सामाजातील ज्वलंत विषयावर भाष्य तर केले जात आहे मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेत सामाजिक समाजभान विसरुन नाट्यलिखाण होतांना दिसते. नाट्यलिखाण करतांना मर्यादाचा विचार करावा आगामी काळात जळगावी नाट्यपरिषद होणार असल्याची चर्चा आहे. डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील नाट्यकलावंतांसोबत सेन्सॉर बोर्ड नाट्यलिखाणाबाबत चर्चासत्र करण्याबाबत त्यांनी सांगितले.
जीएसटीचा परिणाम
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या वस्तु व सेवाकराचा फटका नाट्यक्षेत्राला बसला आहे. कारण जीएसटी लागु होण्याअगोदर राज्याबाहेर किंवा राज्यांतर्गत नाट्य प्रयोगासाठी कमी खर्च येत असे मात्र जीएसटी लागु झाल्यापासून नाट्यकर वाढले असल्याने साहजिकच नाटके महागली असल्याची खंत अभिनेेते नलावडे यांनी व्यक्त केली. स्थानिक पातळीवरील नाटकाचे प्रयोग वाढले पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
महाराष्ट्र ही रंगकर्मींची खाण
महाराष्ट्रासारखी सांस्कृतिक वातावरण इतर कोठेही आढळत नाही. महाराष्ट्राची भूमी ही रंगकर्मीची खाण असून ती कायम टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. नाट्य क्षेत्रात वेगळी मजा आहे. नाट्य लिखाण करतांना सेन्सॉर बोर्डाने ठरवून दिलेले मुद्दे लक्षात घ्यायला हवे. सेन्सॉर बोर्ड हे नेहमी सांस्कृतिक चळवळीसाठी सहकार्य करीत असते त्यामुळे सेन्सॉरच्या चौकटीत राहुनच नाटक लिहीले गेले पाहिजे असे नलावडे यांनी सांगितले.