दिल्लीतील बैठकीत निर्णय; १२५ कोटींची कामे होणार
जळगाव । प्रतिनिधी । जळगाव शहरालगत महामार्ग विस्तार व समांतर रस्त्यांसंदर्भात आमदार एकनाथराव खडसे यांच्या पुढाकाराने आज केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. महापालिकेने तांत्रिक अडचणी दूर केल्यानंतर १२५ कोटी रूपयांच्या कामांना लवकर सुरूवात होईल, असा सकारात्मक निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तांत्रिक बाबींनंतर हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सोपविण्यात येणार आहे. आजच्या दिल्लीतील बैठकीला माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षाताई खडसे, खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार सुरेश भोळे,जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांच्यासह ’नही’चे अधिकारी उपस्थित होते.
समांतर रस्त्यांबाबतचा निर्णय
राष्ट्रीय महामार्ग क्र ६ यावरील समांतर रस्ते व अस्तित्वात असलेला रस्ता याबाबचे निर्णय आजच्या बैठकीत झाले. यात कालिका माता मंदिर ते खोटे नगर यावर हा मुख्य रस्त्या ७.३० किमी सिमेंट काँक्रीटीकरण होईल, त्याच्या दोनही बाजुचे रस्ते समांतर रस्ते डांबरीकरणाचे होतील, तीन बोगदे या रस्त्यावर क्राँसिंगसाठी तयार करण्या येतील, गुजराज पेट्रोलपंप, अग्रवाल चौक व शिवकॉलनी असे, दोनही बाजुंना फुटपाथ व गटार राहिल. मुख्य रस्ता व समांतर रस्ता यामध्ये २ मीटर दुभाजक राहिल व स्ट्रीट लाईट राहतील यासह जळगाव ते औरंगाबाद चौपदरीकरण करण्याचा निर्णय ही या बैठकीत घेण्यात आला आहे.
या संदर्भात ‘जनशक्ति’शी बोलतांना आ. एकनाथराव खडसे म्हणाले की, आजच्या बैठकीत चांगले निर्णय झाले आहेत. महापालिकेने तांत्रिक अडचणी लवकर दूर कराव्यात म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे काम सोपवून ते लवकर मार्गी लागेल.