जळगावातून चोरला ट्रक…औरंगाबादला करणार होते विक्री

0

ट्रक चोरीचा एमआयडीसी पोलिसांकडून पर्दाफाश ; जळगावातील दोघे सराईत गुन्हेगार ताब्यात

जळगाव: शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातून युरीया खताची वाहतूक करणारा ट्रक चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवार 11 रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच एमआयडीसी पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे. वसीम अली शेरअली तेली वय 28 रा. फातेमा नगर व शेख तौसिफ शेख युनूस वय 22 रा. तांबापुरा अशी संशयितांची नावे आहेत. ट्रकचोरीनंतर औरंगाबाद येथे ट्रक विक्रीसाठी चोरटे जात होते, मात्र त्यापूर्वी एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचा ट्रकही हस्तगत करण्यात आला आहे.

काय घडली होती घटना
अफझल अब्बु खान (वय50) रा. रामोशी वाडा ता.जि. नाशिक हे गेल्या पाच वर्षांपासून ट्रक क्रमांक (एमएच 41 जी 5534) वर चालक म्हणून काम करतात. मालवाहतूक ट्रक असल्याने मिळेल तसे भाडे घेवून वाहतूक करत असतात. 10 जुलै रोजी चोपडा येथे युरीया खताची ट्रीप मिळाली. त्यानुसार त्यांनी 11 जुलै रोजी सकाळी 10 चोपड्यात भरलेला ट्रक खाली केला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता पुन्हा जळगावला आहे. यानंतर शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील खूशी ट्रान्सपोर्ट जवळ ट्रक पार्किंगला लावला. जेवण करण्यासाठी बाजुच्या ठिकाणी गेले. पुन्हा परतले असता, रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ट्रक जागेवर उभा दिसून आला नाही. सर्वत्र शोधाशोध घेवूनही ट्रक मिळून आला. चोरीची खात्री झाल्यावर अफजल खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एमआयडीसी व्ही सेक्टरमधून ट्रक ताब्यात
चोरी झालेला ट्रक क्र. एम.एच.41 जी. 5534 हा जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात व्ही सेक्टर येथे येत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक मुद्दस्सर काझी यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना कळविले. लोकरे यांनी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, महेंद्रसिंग पाटील, मुद्दस्सर काझी, इम्रान सय्यद, नितीन पाटील, प्रदीप पाटील, संदीप पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, असीम तडवी, निलेश पाटील, सतिष गर्जे यांनी व्ही सेक्टर या पथकासह व्ही सेंक्टर गाठले. व मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी 6.30 वाजता भारत गॅस गोडावूनजवळ ट्रक अडविला. ट्रकमध्ये वसीम अली शेरअली तेली, शेख तौसिफ शेख युनूस मिळून आले. त्यांना खाकीचा हिसका दाखविला असता, त्यांनी ट्रकचोरीची कबूली दिली. तसेच हा ट्रक औरंगाबाद येथे विक्रीसाठी घेवून जात होतो, अशी माहिती दिली. दोघांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बारी करीत आहेत.

दोघांवरही विविध जिल्ह्यात गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या वसीम अली तेली व शेख तौसिफ हे सराईत गुन्हेगार असून यातील वसीम तेली याच्यावर जळगाव जिल्ह्यात भुसावळ रेल्वे, जळगाव शहर पोलीस ठाण्यात, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तसेच नंदुरबार रेल्वे, औरंगाबाद जिल्ह्यातील पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच शेख तौसि फ यांच्यावर बीडमधील ग्रामीण पोलीस स्टेशन, तसेच जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीचेच गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून इतरही ट्रकसह वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.