शनिपेठ पोलिसांच्या पथकाने लावला 9 तासातच कारचा छडा
जळगाव – शहरातील भवानी पेठेतून घरासमोर लावलेली साडेसात लाख रुपये किमतीची तवेरा चारचाकी लांबविल्याची घटना रविवारी सकाळी 6 वाजेदरम्यान उघडकीस आली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान शनिपेठ पोलिसांनी अवघ्या नऊ तासातच तवेराचा छडा लावला आहे. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथून तवेरा घेवून पथकाने सोमवारी पहाटे 3 वाजता जळगाव गाठले. शहरातील भवानीपेठेत यांनी लहान भाऊ महेश साठी व्यवसायासाठी सप्टेंबर 2015 मध्ये चोलामंडल फायनान्स कडून सुमारे अकरा लाखात पांढर्या रंगाची तवेरा गाडी घेतली होती. रविवारी सकाळी 6 वाजता घरासमोरुन कार घेवून जाण्यासाठी निघाले असता गाडी जागेवर दिसून आली नव्हती. चोरीची खात्री झाल्यावर प्रसन्न वाणी यांनी त्यांनी 7 लाख 50 हजार रुपये किमतीची चारचाकी चोरीझाल्याबाबत रविवारी दुपारी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली.
काच फोडून लॉक उघडले, नंबरप्लेटही बदलली
वाणी यांची चारचाकीला सेंटर लॉक सिस्टीम आहे. तसेच सायरनही होता. चोरट्यांनी वाहनचालकाच्या बाजूने कार फोडला. यानंतर लॉक उघडून तवेरा पळविली. यादरम्यान चोरट्यांनी लॉक तोडतांना सायरन वाजू नये ही खबरदारी घेतली होती. तसेच यादरम्यान चोरट्यांनी गाडीवरुन महाराष्ट्र शासन खोडून काढले होते. मूळ नंबरप्लेट बदलावून एम.एच 21 व्ही 0806 ही नंबप्लेट लावली होती.
सोशल मिडीया ठरला तपासात महत्वाचा दुवा
चारचाकी लांबविल्याच्या घटनेचा तपास शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेशसिंग पाटील यांच्याकडे होता. त्यांनी कारचे वर्णन तसेच त्यानुसार नाकाबंदी करण्याबाबतची माहिती सोशल मिडीयावरुन पसरली होती. त्यानुसार जालना पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. तवेरा जाफराबाद येथील एका गॅरेजवर लावून चोरटे पसार झाले होते. दिनेशसिंग पाटील यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र पवार, पोलीस कॉन्स्टेबल राहूल घेटे, पोलीस नाईक अनिल धांडे, रविंद्र गुळचर यांनी तवेरा ताब्यात घेतली. तवेरासह सोमवारी पहाटे तीन वाजता जळगाव गाठले.