दुप्पट पैशांचे आमिष ; अनेकांना कोट्यवधींचा गंडा
जळगाव: नाशिक येथील माऊली पतसंस्था व संकल्प सिध्दी प्रॉडक्टस कंपनीने गुंतवलेल्या पैशांवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून नाशिक, धुळे, जळगाव तसेच नगर येथील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रूपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नाशिकला गुन्हा दाखल झाला असून, या गुन्ह्याच्या तपासकामी नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी जळगावात धडक मारली. या पथकाने चौकशीत पतसंस्थेच्या एजंटांना उद्दिष्टपूर्तीबद्दल मिळालेल्या महागड्या दोन कार जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे जप्त केलेल्या कारपैकी एक कार ही जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचा कर्मचारी वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. हा कर्मचारी कोण? जळगावला हाच पोलीस कर्मचारी एजंट म्हणून काम पाहत होता काय? व त्याच्या माध्यमातून जळगावातील अनेकांनी गुंतवणूक तर केली नाही ना? हे प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.
या प्रकरणी संस्थापक विष्णू भागवत व अन्य संचालकासह दोनही कंपन्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभरातील ग्राहकांकडून पैसे गुंतविणार्या एजंट लोकांना चारपट तर गुंतवणूकदारांना दाम दुप्पट रक्कम देण्याचा फंडा वापरून संशयितांनी कोट्यवधी रूपयांची माया गोळा केल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांनी तगादा लावल्यानंतर पैसे मिळत नसल्याचा अनुभव आल्याने गुंतवणूकदारांनी कार्यालयाची तोडफोड केली होती. उद्दिष्ट पूर्ण करणार्या एजटांना दिलेल्या महागड्या दोन कार नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रूपेश केदार यांनी शनिवारी जळगावमधून जप्त करून रामानंदनगर पोलिसात लावल्या आहेत.