जळगाव: शहरातील फुले मार्केटमध्ये खरेदी करतेवेळी पाठीवर, डोक्यावर केमिकल टाकून अॅड. पूजा ओमप्रकाश व्यास रा. बालाजीपेठ या वकील तरुणीच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविल्याचा प्रयत्नातील महाविद्यालयीन विद्यार्थीनीला पकडल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजता घडली. सोनसाखळी तोडल्यानंतर पळालेल्या विद्यार्थीनीला पोलिसांनी पाठलाग ताब्यात घेतले. हर्षदा किशोर महाजन वय 19 रा. बोदवड असे संशयित विद्यार्थीनीचे नाव आहे. ती विद्यापीठात बीबीएमच्या दुसर्या वर्षाला असून वसतीगृहात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.
शहरातील 102, बालाजीपेठ येथे पूजा ओमप्रकाश व्यास ही आई वडील, बहिण, भाऊ या कुटुंबासह वास्तव्यास आहे. पूजा ह्या वकील असून त्या जिल्हा न्यालयात वकील म्हणून सराव करत आहेत. 6 रोजी दुपारी 1 वाजता पूजा ही बहिणी आरती सोबत फुले मार्केट येथे खरेदीसाठी आल्या होत्या दोन्ही बहिणी खरेदी करुन दीड वाजेच्या सुमारास नुतन ड्रायफूट दुकानासमोरुन पायी चालत असताना तोंडाला स्कार्प बांधलेल्या एका तरुणीने पूजा व आरती या दोघांच्या मानेवर द्रव्य पदार्थ टाकले. यानंतर मानेवर आग व्हायला लागल्याने पूजा मागे वळून पाहत नाही तोच द्रवपदार्थ टाकणार्या तरुणीने पूजा यांच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडली व पळून गेली.
शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर प्रकार असल्याने आरडाओरड एैकून शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, सुनील पाटील, भरत ठाकरे, सुधीर सावळे, प्रनेश ठाकूर, रविंद्र साबळे, नवजीत चौधरी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. यानंतर पळत असलेल्या तरुणीला ताब्यात घेतले. तिच्या हातात पूजा यांची साडे पाच ग्रॅमची 20 हजार रुपये किमतीची लांबविलेली पोत मिळून आल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. बोदवड येथील सधन शेतकर्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली आहे.