जळगाव। शहरातील रेल्वे स्टेशनजवळील परीसरात एका हॉटेलच्या उद्घटनासाठी प्रसिद्ध बॉलीवुड सिनेअभिनेता गोविंदा येणार आहे ही वार्ता त्याच्या चाहत्यांना मिळाली असता त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. तो ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशिरा आला तरीदेखील त्याचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी गर्दी करुन त्याची वाट पाहत थांबले होते. भर उन्हात चाहते ताटकळले. हॉटेलचे उद्घाटन गोविंदाने केले. यानंतर त्याने हॉटेलच्या बाहेर येऊन हात उंचावत चाहत्यांना अभिवादन केले. तसेच गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष करीत उपस्थितांची मने जिंकली. याला प्रत्युत्तर देत गर्दीनेही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला व हात उंचावून आनंद व्यक्त केला.
मुख्य रस्त्यांवरच चाहते होते थांबून
शहरात रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी अभिनेता गोविंदा आला. दुपारी 12.30 वाजता तो येईल, असे संयोजकांनी सांगितले होते. परंतु त्याला येण्यास तासभर उशीर झाला. तोर्पयत व.वा.वाचनालय, देशमुख शाळा व या भागातील मुख्य रस्त्यांवर अनेक चाहते थांबले. दुपारी 1.34 वाजता गोविंदाचे आगमन झाले. पांढर्या रंगाच्या महागडी चारचाकीतून गोविंदाचे आगमन झाल्याने चारचाकीभोवती चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. अनेकांनी मोबाईलमध्ये त्याची छायाचित्रे व व्हीडीओ काढण्यास सुरुवात केली.
चाहत्यांना अभिवादन
यावेळी प्रचंड लोटालोटी व आरडाओरड सुरू झाली. अशातच 10 ते 12 बाउन्सरांनी गोविंदाभोवती साखळी तयार केली व त्याला हॉटेलात सुरक्षितपणे नेण्यात आले. हॉटेलचे उद्घाटन केल्यानंतर गोविंदाने बाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन केले. वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ म्हणत त्याने गणपती बाप्पा मोरया, असा जयघोष केला. या वेळी चाहत्यांनी एकच आनंद व्यक्त करीत प्रतिसाद दिला. गोविंदाने जळगावात आल्याचा विशेष आनंद होत आहे. मला जळगावात प्रेम मिळाले. चाहते एवढया उन्हात भर रस्त्यावर उभे आहेत. खूप प्रेम चाहत्यांकडून मिळाले, असे म्हणत गोविंदाने चाहत्यांचा निरोप घेतला.