जळगावात अल्पवयीन चोरटे पडताहेत “पोलिसां”वर भारी

0

नेहरुनगरातून अल्पवयीन चोरट्यांनी  कुलूपबंद घरातून पितळी, तांब्याची भांडी लांबविली

सीसीटीव्हीत दोघे अल्पवयीन चोरटे  कैद

भरदिवसाच्या प्रकाराने नागरिक धास्तावले

जळगाव – खाजगी कामासाठी पसिरातच गेलेल्या महिलेच्या कुलूप बंद घरात अल्पवयीन चोरट्यांनी हात दाखवून घरातील पितळी, तांब्याची भांडे लांबविल्याची घटना दुपारी 12 वाजेच्या सुमारास नेहरुनगर मध्ये घडली. दोघे अल्पवयीन चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून भरदिवसाच्या प्रकाराने येथील नागरिक भयभीत झाले आहेत.

शहरात मोहाडी रस्त्यावरील बालाजी हाईटच्या मागे प्रा. प्रशांत विश्‍वनाथ महाजन हे पत्नी माधुरी तसेच पाच वर्षाचा मुलगा चिरागसह राहतात. महाजन हे शहरातील बाहेती महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. शुक्रवारी ते कामानिमित्ताने भुसावळला निघाले. याचवेळी काही कामासाठी त्यांची पत्नी माधुरी ही मुलाला घेवून नेहरुनगरात खाजगी कामानिमित्ताने गेली होती. यावेळी त्यांनी घराचे कुलूप लावले होते. पुन्हा घरी परतले तेव्हा कुलूप दरवाजा उघडा दिसला तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यांनी तत्काळ प्रकार पती प्रशांत महाजन यांना कळविला. महाजन अर्ध्या रस्त्यातूनच पुन्हा घराकडे परतले.

15 मिनिटे चोरटे घरात
महाजन यांच्या घराचे बांधकाम सुरु आहे. ते वरच्या घरात राहतात. चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणची टॅमी उचलून दरवाजाचा कोयडा तोडला. व घरात प्रवेश करुन कपाटांमध्ये तपासणी केली. हातात काहीच न लागल्याने चोरट्यांनी तांब्याची तसेच पितळ्याची भांडे लांबविली. महाजन यांच्या शेजारी रितेश मोतीराम रमानी यांच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये चोरटे 12 वाजेच्या सुमारास येतांना व 15 मिनिटांनी जातांना दिसताहेत. 15 मिनिटात माधुरी महाजन घरी परतेपर्यंत चोरीचा प्रकार घडला. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी पाहणी केली आहे.

अल्पवयीन चोरटे सक्रीय
शहरात विवेकानंद नगरात परिवहन मंडळातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांकडे चोरी झाली होती. यात चोरट्यांनी 1 लाखांचा एैवज लांबविला होता. यातही पितळी भांड्यांची चोरी झाली होती. गुरुवारी सकाळी बसस्थानकात बसमध्ये चढणार्‍या महिलेच्या गळ्यातून 10 वर्षीय मुलीने मंगळसूत्र ओढून पोबारा केला होता. या दोन्ही घटनांमुळे शहरात अल्पवयीन चोरटे सक्रीय झाले असल्याचे समोर आले आहे.