जळगाव : आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीररित्या गुटखा व पानमसाला विक्री होत असल्याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत गुटख्याचा साठा जप्त करीत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
आकाशवाणी चौकातील लाली पान सेंटर येथे बेकायदेशीर गुटखा आणि पानमसाल्याची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती अन्न व औषध विभागाला मिळाली. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा देविदास महाजन यांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पथकासह छापा टाकला. त्याठिकाणी काही विक्रीसाठी पानमसाला आणि गुटखा यांची साठवणूक केल्याचे आढळून आले. यासंदर्भात अवैधरित्या गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. रामानंदनगर पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांच्या फिर्यादीवरून रात्री लाली पान सेंटरचे मालक व चालक दिनेश फुलचंद हसवान (रा.देवेंद्र नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहे.