जळगाव : गृहमंत्र्यांच्या जळगाव दौर्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकार्यांची अडवणूक केल्याप्रकरणी जळगाव औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रताप शिकारे यांना तातडीने नियंत्रण कक्षात अॅटॅच करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पदाधिकार्यांनी केल्या तक्रारी
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे एक दिवसीय जिल्हा दौर्यावर आले असता गृहमंत्र्यांचे आगमन होत असतांना त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रवक्ते योगेश देसले आदी इतर पदाधिकार्यांसोेबत त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. याप्रसंगी गृहमंत्र्यांचे आगमन होत असतांना तेथे सुरक्षेसाठी असणारे एमआयडीसी पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी काही पदाधिकार्यांना आतमध्ये पासशिवाय जावू देण्यास नकार दिल्यानंतर या संदर्भात पदाधिकार्यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानुसार रात्री उशीरा प्रताप शिकारे यांना पोलिस नियंत्रण कक्षात अॅटॅच करण्यात आले.
पोलिस अधीक्षकांनी दिला दुजोरा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी शिकारे यांना नियंत्रण कक्षात अॅटॅच केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तात्पुरत्या स्वरूपात ही कारवाई असल्याचे त्यांनी सांगितले.
शिस्तप्रिय अधिकार्याच्या बदलीने उडाली खळबळ
व्हीआयपी पदाधिकारी आल्यानंतर बंदोबस्तासाठी असलेल्या अधिकार्यांची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडते. पासशिवाय प्रवेश देवू नये, असे वरीष्ठांचे संकेत अधिकार्यांकडून पाळले जातात मात्र ऐनवेळी होणारी गर्दी रोखण्यासाठी अधिकारी नियमांचे पालन करतात मात्र याबाबत तक्रारी होताच अधिकार्यांवर कारवाई होत असल्याने नाराजीचा सूरदेखील पोलिस वर्तुळात्ून अनेकदा उमटतो.