जळगावात किरकोळ वादातून तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला

जळगाव : किरकोळ वादातून दोघांनी जळगावच्या समता नगरातील पाणी पाऊच फॅक्टरीजवळ आनंदा उर्फ नारायण श्रीकृष्ण जंजाळे या तरुणास मारहाण केली तसेच डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना सोमवार, २८ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल देण्याच्या वादातून हल्ला
संभाजी नगर रीक्षा स्टॉपजवळ असलेल्या समतानगरात कलर काम करून उदरनिर्वाह करणारा आनंद जंजाळे (२८) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता घराजवळच राहणारे मुकेश राजू सोनवणे (२१) व अजय राजू सोनवणे (२२) या भावंडांनी आनंदला मारहाण केली. भांडण पाहून आनंदची आई त्याठिकाणी भांडण आवरण्यासाठी आली असता मुकेश याने तुझा मुलगा मला सापडलेला मोबाईल हा किरणला देऊन टाक, असे सांगत आहे. त्यामुळे माझ्यात व किरणमध्ये भांडण झाले हे भांडण तुमच्या मुलामुळे झाले, असून मी त्याला जीवे ठार करिन असे म्हणत मुकेश व अजय याने आंनद यास लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर मुकेश याने आनंदच्या डोक्यात मागील बाजूने लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात आनंद हा गंभीर जखमी झाला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
मुकेश व अजय यांनी आनंद व त्याच्या आईस देखील शिवीगाळ करीत धमकी दिली व ते तेथून निघून गेले. जखमी आनंदवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून आनंद याची आई लताबाई जंजाळे यांच्या फिर्यादीवरून रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत.