जळगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, रुग्णसंख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीत तातडीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू होण्याची अपेक्षा असताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत मात्र, तत्परतेने निर्णय घेण्याऐवजी वेळकाढूपणा करत आहेत का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात एकाच दिवशी कोरोनाचे 124 नवीन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतरही पॉझिटीव्ह रुग्णांचे निदान होतच आहे. हे रुग्ण वाढण्यामागे जनतेचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. हे काही लपून राहिलेले नाही. पण गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात प्रशासनदेखील तितकेच अपयशी ठरत आहे. रुग्ण वाढू नयेत म्हणून जिल्हाधिकार्यांनी तातडीने निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणीचे सक्त आदेश काढणे अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात घडते आहे ते उलटच. जिल्हाधिकार्यांनी बुधवारी, जळगाव शहराच्या विविध क्षेत्रातील प्रतिनिधींची एक बैठक जळगाव महापालिकेत घेतली. कोरोनाला रोखण्यासाठी काय-काय करता येईल याच्या सूचना त्यांच्याकडून जिल्हाधिकार्यांनी घेतल्या. तसेच यापुढे रुग्णसंख्या वाढत राहिल्यास शाळा बंद करू, असा इशारा दिला. पण कोरोनाला रोखण्यासाठी गुरुवारपासून तातडीने काय करणार हे काही त्यांनी स्पष्ट केले नाही.
रुग्णसंख्या वाढण्याची वाट पाहण्यापेक्षा आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात का नाही ? मास्क न वापरणार्यांवर कारवाई केव्हापासून करणार ? रुग्ण वाढण्यास कारणीभूत ठरणारे लग्नसोहळे, वाढदिवस व इतर समारंभ, राजकीय पक्षांचे मेळावा, सभा यांच्यातील गर्दीवर निर्बंध केव्हा घालणार ? अकोला, नागपूरमध्ये प्रशासन कठोर होऊ शकते, तर जळगावचे जिल्हाधिकारी निर्णय घेण्यात का मागे पडत आहेत ? जिल्हाधिकारी नक्की करताहेत तरी काय? कोरोनाच्या येत असलेल्या दुसर्या लाटेकडे जिल्हाधिकारी गांभीर्याने बघत आहेत का ? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
कारवाईची सुरुवात कार्यालयापासूनच करावी लागणार
व्यापार्यांनी आपले म्हणणे अभिजीत राऊत यांचा समोर ठेवले व राऊत यांनीदेखील राणाभीमदेवी थाटात नियमांचे काटेकोर पालन करा अन्यथा आम्ही आपल्यावर कठोर अशी कारवाई करू, असे ठणकावून सांगितले पण आतापर्यंत राऊत यांनी किती कारवाया केल्या ? जळगाव शहर किंवा जिल्ह्याचे राहू द्या, पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्येही विना मास्क फिरणारे बरेच दिसतात. त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.