जळगावात गो डिजीटल कार्यशाळा

0

जळगाव । शहरातील जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री भंवरलालभाऊ जैन सभागृहात रविवारी सकाळी ‘गो डिजीटल’ या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यात ‘जनशक्ति’चे कार्यकारी संपादक शेखर पाटील, ‘सोशल मीडिया सोल्युशन’चे दिलीप तिवारी आणि ‘क्रियेटिव्ह कंप्युटर्स’चे गोकुळ चौधरी यांनी अनुक्रमे ‘डिजीटल टुल्स’, काँटेट आणि ग्रुप एसएमएस व अन्य सुविधांबाबत मार्गदर्शन केले. यात सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कार्यक्रमानंतर विविध शंकांचे निरसन करण्यात आले.

संदेशवहन यंत्रणा
गोकुळ चौधरी यांनी व्यावसायिक आणि वैयक्तीक पातळीवर ग्रुप व बल्क एसएमएस पासून ते बल्क व्हाटसअ‍ॅप मॅसेजपर्यंतच्या सेवा आपण प्रदान करत असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाभ होत असल्याची माहिती दिली. आपल्याकडे देश आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात माहितीचा साठा असून आपल्या ग्राहकांना याचा लाभ होत असल्याचेही ते म्हणाले. विशेष बाब म्हणजे या सर्व सेवा आपल्याकडे एकाच ठिकाणी माफक दरात उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

‘डिजीटल प्रेझेन्स’साठी सुलभ सुविधा
शेखर पाटील यांनी मार्गदर्शनात आजच्या युगात ‘डिजीटल प्रेझेन्स’ किती महत्वाचा आहे? यावर माहिती दिली. स्वत:चे डोमेन नेम, प्रोफेशनल ई-मेल आयडी, गुगलच्या विविध व्यावसायिक सेवांवरील लिस्टींग आदी बाबी या एक तर मोफत अथवा अल्प मूल्यात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. तंत्रज्ञान हे जितके उच्च तितकेच ते वापरण्यास सोपे असून याचा वापर करण्यासाठी फक्त आपल्या मनोदशेचा अडसर आहे. सायबरविश्‍वात स्वत:चे अस्तित्व निर्माण केल्यास आपणास वैयक्तीक पातळीसह व्यवसाय आणि उद्योगाच्या वृध्दीसाठीही लाभ होत असल्याचे ते म्हणाले. यासाठी त्यांनी ‘टेकवार्ता’ या पोर्टलच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. याचसोबत ‘जनशक्ति’त होत असलेले विविध डिजीटल प्रयोगदेखील त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमुद केले.

काँटेंट इज किंग
दिलीप तिवारी यांनी डिजीटल काँटेंटवर आपल्या ओघवत्या शैलीत मार्गदर्शन केले. त्यांनी अत्याधुनिक संपर्क यंत्रणांमध्ये वापरण्यात येणार्‍या माहितीतल्या उथळपणाची विविध उदाहरणे देत यासाठी भान बाळगणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. डिजीटल टुल्स आणि यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा आज उपलब्ध आहे. मात्र आपण जर याचा अविचाराने वापर केला तर काहीही उपयोग होत नसतो. यामुळे ‘काँटेंट इज किंग’ हेच सत्य असल्याचे ते म्हणाले. यासाठी प्रत्येकाने सोशल मीडियात सुजाणपणे शेअरिंग करावे अन्यथा उत्तम दर्जाचा सोशल मीडिया हँडलरची सेवा घ्यावी, सोशल मिडीयाचा सकारात्मक विचार सरणीतून वापर केल्यास लाभ निश्‍चित आहे. असेही दिलीप तिवारी यांनी यावेळी आपल्या मार्गदर्शनात नमुद केले.