निमखेडी शिवारात केल्या चोर्या ः स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
जळगाव :- शहरातील निमखेडी शिवारात घरफोड्या करणार्या मुळ राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील रहिवासी अट्टल गुन्हेगार ट्रक चालक संजय भवरलाल देवडा(वय-45,रा.पाली राजस्थान) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याने ट्रकचालक व्यवसायाला घरफोडीचे साधन बनवले होते. आंध्र प्रदेश ते गुजरात महामार्गालगतच्या नागरी वस्त्यांना लक्ष करीत घरफोड्या करुन होत पसार होत असल्याची माहिती मिळाली आहे. त्याने गिरणाई कॉलनीतील घरफोडीची कबूली दिली असून त्याच्याकडून चोरीचे 6 तोळे सुमारे अडीच लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनात घरफोड्यांचा तपास गुन्हे शाखा निरीक्षक बापु रोहम हे करीत होते. त्यासाठी सहाय्यक निरीक्षक स्वप्नील नाईक, राजेंद्र पाटिल, चंद्रकांत पाटील, किशोर राठोड,विनोद पाटील, अरुण राजपुत, रणजीत जाधव नरेंद्र वारुळे, विजय पाटील यांचे पथक नियुक्त केले. पथकाने राजस्थानच्या जिल्ह्यातील संजय भवरलाल देवडा(वय-45) याला ताब्यात घेतले. संशयीताला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने निमखेडी शिवारातील रमेश जगदेव सरदार (रा.गिरणाई कॉलनी) यांच्या घरची घरफोडी कबुल केली असून घरफोडीतील 6 तोळे सुमारे अडीच लाखांचे सोने काढून दिले आहे.
ट्रक खराब झाल्याचा बहाणा करुन घरफोडी
अटकेतील संजय देवडा हा ट्रक चालक असून आंध्र ते गुजरात या मार्गावर तो, आधी ट्रक मध्ये माल भरुन नेत असते. नियोजीत जिल्ह्यात माल खाली केल्यावर महामार्गालत ट्रक खराब झाल्याचा बहाणा करुन ट्रक उभा करुन ठेवत असे, त्या ठिकाणी दिवसा रेकी करुन रात्री बंद घरफोडून माल लंपास करत होता. त्याने निमखेडी शिवारातील रेश्मी समीर ठाकुर (बिबा पार्क-22 ऑक्टोबर), अरुण मनोहर बडगुजर(द्वारका नगर,14 ऑक्टोबर),चंद्रशेखर भालचंद्र ठाकुर(द्वारका नगर,21ऑक्टोबर) या तीन घरफोड्यांबाबत संशयीताकडे तपास सुरु असून संजय देवडा याने सोलापुर जिल्ह्यात 11 घरफोड्या केल्याचे तसेच महामार्गालगत विवीध राज्यात घरफोड्या केल्याचे कबुल केले आहे.