जळगावात चोरटे शिरजोर : बंद घर फोडले

जळगाव : शहरातील गणपती नगरात बंद घरफोडून घरातील गॅस सिलेंडरसह इलेक्ट्रिक साहित्य चोरून नेण्यात आले. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा

सुमंगल केशव वाणी (77, रा.इच्छादेवी मंदिराजवळ, गणपती नगर, जळगाव)हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते मुंबई येथे मुलाकडे परीवारासह भेटायला गेले होते. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून मुंबईला गेले. बर्‍याच दिवसांपासून बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील दोन गॅस सिलेंडर, शिलाई मशीन, इन्व्हर्टर मशिन आणि इेलक्ट्रिक फीटींगचे वायरी असा एकुण 15 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. सुमंगल वाणी हे शनिवारी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता घरी आले तेव्हा त्यांचे घर उघडले दिसले. घरात जावून पाहिले असता घरातील सामान अस्तव्यस्त असलेले दिसले.त्याची घरात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून चोरी झाल्याची माहिती दिली. याप्रकरणी सुमंगल वाणी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार संजय सपकाळे करीत आहे.