जळगाव : जळगाव जिल्हा कारागृहामागील विवेकानंद नगरात जुगाराचा रंगलेल्या डाव्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत पाच जुगारींसह दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याने जुगारींच्या गोटात खळबळ उडाली. सोमवार, 25 रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव जिल्हा कारागृहाच्या पाठीमागील विवेकानंद नगरात जुगार अड्डा सुरू असल्याची गोपनिय माहिती सहा.पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना सोमवारी 25 एप्रिल रोजी दुपारी मिळताच त्यांनी कारवाईचे आदेश दिले. जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर, पोलिस मुख्यालयातील आकाश शिंपी, आकाश माळी, रवींद्र सुरळकर, जीवन जाधव, राहुल पाटील, चंद्रकांत चिकटे, हवालदार सुहास पाटील, नाईक रवींद्र मोतीराया, निलेश पाटील यांच्या पथकाने एक वाजेच्या सुमारास छापा टाकताच जुगारींमध्ये पळापळ झाली.
पाच संशयीतांना अटक
पोलिसांनी राजु तडवी (35, किनगाव, ता.यावल), रामकृष्ण साहेबराव सपकाळे (34, कांचन नगर, आसोदा रोड, जळगाव), रमेश श्रावण सोनवणे (48, बालाजी मंदिरामागे, जळगाव), चेतन अनिल भालेराव (23, स्वामी विवेकानंद नगर, जळगाव), कुणाल महेश कोळंबे (22, स्वामी विवेकानंद नगर, जळगाव) यांना अटक करण्यात आली. या कारवाईत 7 हजार 320 रुपयांची रोकड, जुगाराचे साहित्य, एक लाख 98 हजार 600 रुपये किंमतीचे मोबाईल, रीक्षा आणि दुचाकी असा एकूण दोन लाख 5 हजार 920 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुख्यालय कर्मचारी निलेश भगवान राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.