जळगाव : शहरातील के.सी.पार्क येथे किरकोळ कारणावरून शेकोटीमधील जळते लाकूड तरूणाच्या डोक्यात मारून गंभीर जखमी करण्यात आले. याप्रकरणी शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी रात्री शहर पोलिसस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
शेकोटी सुरू असताना मारहाण
शहरातील कानळदा रोडवरील त्रिभवन कॉलनीतील सतिष गणेश ठाकरे (27) हा तरुण कुटुंबियांसह वास्तव्यास असून हातमजूरी करुन ते कुटुंबाला हातभार लावतो. 14 जानेवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या शहरातील के.सी.पार्क येथे शेकोटीजवळ बसलेला किशोर कांबळे (पुर्ण नाव माहिती नाही) याने सतीषला शिवीगाळ केली. किशोर कांबळे याने शिवीगाळ करीत त्याच्या हातातील सिगारेट पिवून त्याचा धूर सतीषच्या तोंडावर सोडला. त्यानंतर माझ्यासमोर खाली बस असे म्हणू लागला. सतिषने त्याचे न ऐकल्याने किशोरने शेकोटीत पेटणारी लाकूड उचलून सतीशच्या डोक्यावर मारले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सतीश जमिनीवर कोसळला.
शहर पोलिसात गुन्हा
सतीषला मारहाण झाल्यामुळे त्याच्या मेंदूजवळ रक्ताची गाठ तयार झाली होती. परंतू खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी अधिक खर्च लागणार असल्याने त्यांनी सतिषला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. याठिकाणी शस्त्रक्रियेसाठी त्यांना गोदावरी हॉस्पीटल येथे जाण्याचा सल्ला दिला. गोदावरी हॉस्पीटल येथे सतिषवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याच्या डोक्याच्या बाजूला 24 टाके पडले आहे. याप्रकरणी शुक्रवार, 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजता सतिष ठाकरे याच्या फिर्यादीवरून किशोर कांबळे उर्फ बंग्गी याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहे.