जळगावात तिसरा रुग्ण; अमळनेरच्या महिलेला कोरोनाची लागण

0

जळगाव: जळगाव जिल्ह्यात करोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. अमळनेर तालुक्यातील एका ६० वर्षीय महिलेला करोना सदृश्य आजाराची लक्षणे दिसून आल्याने तिला १७ एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातील करोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले आहे. तिच्या घशातील स्वॅब घेऊन ते चाचणीसाठी धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते. या चाचणीचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तो पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे.

जळगाव शहरातील मेहरूण भागातील एका ४९ वर्षीय प्रौढासह सालारनगरातील ६३ वर्षीय वृद्धाला करोनाची लागण झाली होती. यातील सालारनगरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर मेहरूण येथील प्रौढावर यशसस्वीरीत्या उपचार करुन त्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आहे. यामुळे जळगाव जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे मानण्यात येत असताना शनिवारी रात्री एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमळनेर तालूक्यातील या ६० वर्षीय महिलेची ट्रॅव्हल हिस्ट्री नाही तरीही या महिलेला करोनाची लागण कशी झाली? याबाबत माहिती काढली जात आहे. ही माहिती मिळाल्यानंतरच महिलेला करोनाची लागण कशी झाली, याचे उत्तर मिळणार आहे, असे जिल्हा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी सांगितले.