जळगावात दीड लाखाचा ऐवज लांबवला : चोरटा जाळ्यात

जळगाव : शहरातील एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील ‘जय भोले’ नावाच्या कंपनीतून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल मिळून एक लाख 52 हजार 500 रूपयांचा ऐवज लांबविणार्‍या संशयित आरोपीला भोपाळ येथून अटक करण्यात आली. भीमकुमार परमहंश यादव (बिहार) याला शुक्रवारी अटक करण्यात आली. आरोपीला शनिवार, 12 फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला 16 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

चोरी प्रकरणी दाखल होता गुन्हा
भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील व्यापारी अमर दयालदास कटीयारा (42) यांची एमआयडीसीतील जी 20 सेक्टर येथे जय भोले नावाची कंपनी आहे. कंपनी बंद असतांना बुधवार, 9 फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीचे कुलूप तोडत कंपनीत प्रवेश करीत कंपनीच्या ऑफिसमधील एक लाख 52 हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी अमर कटियारा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता..

गोपनीय माहितीवरून अटक
दरम्यान, गुन्हा आरोपी भीमकुमार परमहंश यादव केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास शुक्रवारी भोपाळ येथून अटक करण्यात आली. ही कारवाई एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत कळसकर, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे.