जळगावात दोन गट समोरा-समोर भिडले : परस्पर विरोधात गुन्हे दाखल

जळगाव : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील सहा जण जखमी झाले. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या.

दोन्ही गटातर्फे तक्रार
पहिल्या फिर्यादीत वर्षा ईश्वरलाल परदेशी (34, तुकाराम वाडी) यांनी म्हटले आहे की, शुक्रवार, 15 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्या गल्लीतील पुष्पा विजय ओतारी यांच्याशी भांडण झाले. त्यावेळी पवन विजय ओतारी आणि किरण काळे (तुकाराम वाडी) हे देखील आले. यातील पवन ओतारीने हातातील चाकूने राधा परदेशी यांच्या कपाळावर वार करून जखमी केले. भांडण सोडविण्यासाठी राधा परदेशी यांच्या दिरानी वर्षा परदेशी ह्या आल्या असता किरण काळे यांने दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला. या घटनेत वर्षा परदेशी आणि राधा परदेशी जखमी झाल्या. वर्षा परदेशी यांच्या फिर्यादीवरून 16 एप्रिल रोजी मध्यरात्री संशयीत आरोपी पुष्पा विजय ओतारी, पवन विजय ओतारी आणि किरण काळे (तिघे रा. तुकाराम वाडी) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसर्‍या फिर्यादीत विजय शंकर ओतारी (50, तुकाराम वाडी) यांनी म्हटले आहे की, शुक्रवार, 15 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गल्लीतील प्रेम परदेशी आणि अजित परदेशी हे शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारण्यासाठी गेले. याचा राग आल्याने प्रेम परदेशी याने विजय ओतारी यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर दुखापत केली तर अजीत परदेशी याने लाकडी दांडक्याने पवन विजय ओतारी याला बेदम मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी विजय ओतारी यांच्या फिर्यादीवरून शनिवार, 16 एप्रिल रोजी मध्यरात्री संशयित आरोपी प्रेम परदेशी आणि अजित परदेशी (दोन्ही रा. तुकाराम वाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील सोनार आणि हवालदार प्रदीप पाटील करीत आहे.