जळगावात नंदनवन कॉलनीत सकाळच्या प्रहरीच दोन घरे फोडली

0

चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच ; कुटूंबिय खाजगी काम आटोपून परतल्यावर प्रकार उघड ; एका घरातून रिकामे तर दुसर्‍या घरातून लाखांचे दागिणे लागले चोरट्यांच्या हाती

जळगाव- सत्संगाचा कार्यक्रम तसेच परिक्षा अशा प्रकारे काही तासांसाठी घराबाहेर पडलेल्या कुटुंबियांच्या दोन वेगवेगळी घरे फोडल्याची घटना सकाळी 8.30 ते 10 या वेळेत श्रध्दा कॉलनी परिसरातील नंदनवन कॉलनीमध्ये घडली. विशेष म्हणजे शेजारी, पाजारी सर्व जण घरी असतांना चोरट्यांनी हिंमतीने घरे फोडली. सकाळच्या पहिल्याच प्रहरीच्या घटनांमुळे रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच असून एका घटनेचा तपास लागत नाही तोच दुसर्‍या ठिकाणी घटना समोर येत आहे. विशेष म्हणजे भरदिवसा घटना घडत असल्याने पोलिसांचा धाक संपला की काय असाही प्रश्‍न उपस्थित होत आहे.

रिकामे हाते परतले चोरटे
नंदनवन कॉलनी शरद सुधाकर चव्हाण हे पत्नी व मुलासह वास्तव्यास आहेत. ते इलेक्ट्रीकच्या दुकानावर कामाला आहे. मुलगा शाळेत तर सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास चव्हाण दाम्पत्य घराला कुलूप बंद करुन सत्संगाच्या कार्यक्रमासाठी शहरातील यशोदया हॉल येथे गेले होते. कार्यक्रमाहून 11 वाजेच्या सुमारास दाम्पत्य कार्यक्रमाहून घरी परतले. घर उघडे तर घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. सुदैवाने काही रक्कम चव्हाण हे सोबत तर कार्यक्रम असल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभा यांनी दागिणे अंगावर परिधान केले होते. या व्यतिरिक्त घरात काहीही एैवज नसल्याने चोरट्यांना रिकामे हाते परतावे लागले.

सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरुन लाखांचे दागिणे लांबविले
नंदनवन कॉलनीत चव्हाण यांच्या घरापासून काही अंतरावर सेवानिवृत्त शिक्षक विश्‍वनाथ श्रीधर चौधरी यांचे मधुबन नावाचे घर आहे. पहूर येथील आर.टी. लेले या शाळेत चौधरी कार्यरत होते. तर त्यांची पत्नीही रेल्वे डाकसेवेत नोकरीला होती. 31 मे रोजी त्या निवृत्त झाल्या. पती, पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार आहे. मोठा मुलगा पंकज हा इंजिनिअर असून तो विवाहीत आहे. पत्नीसह तो औरंगाबाद येथे राहतो. तर लहान उमेश हा शिक्षणाकामी पुण्याला राहतो. 10 ते 15 दिवसांपूर्वीच तो जळगावला तलाठी पदासाठी परिक्षा असल्याने जळगावला आला होता. तो घरी आल्यानंतर म्हणजेच दोन दिवसांपूर्वी आई, वडील हे मोठ्या भावाकडे औरंबादला गेले. शुक्रवारी तलाठी पदासाठी लेखी परिक्षा असल्याने 8.30 वाजेच्या सुमारास उमेश कुलूप बंद करुन परिक्षेसाठी गेला. परिक्षा आटोपल्यावर 12.45 वाजेच्या सुमारास तो घरी परतला असता त्याला घराचे कुलूप तुटलेले लोखंडी व लाकडी अशी दोन्ही दरवाजे उघडी दिसली. घरात गेल्यावर त्याला बेडरुमध्ये कपाट, बेड अशा सर्वच ठिकाणचा सामान अस्ताव्यस्त फेकलेला दिसून आला. उमेशला आईवडीलांना फोन करुन प्रकार कळविला. आईन सांगितल्यानुसार घरात दोन तोळे मंगळसूत्र, प्रत्येकी 5 ग्रॅमचे कानातले तीन जोड, साडे सात ग्रॅमच्या साखळ्या, 5 ग्रॅमची अंगठी व 500 ते 700 रुपयांची चिल्लर असा दीड ते दोन लाखांचा एैवज लांबविला.

पोलीस पाऊणतास उशीरा पोहचले
रामानंदनगर पोलिसांना चोरी झाल्याचा प्रकार 11 वाजेच्या सुमारास कळविला. यानंतर तब्बल पाऊणतास पोलीस उशीरा पोहचल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान दोन्ही घरांच्या ठिकाणी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. सकाळी सकाळीच घडलेल्या या घटनांनी रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. 8.30 ते 11 या वेळेत अवघ्या अडीच तासात चोरट्यांनी घर फोडली. विशेष म्हणजे शेजारी रहिवाशांना याची कुठलीही भनक चोरट्यांनी लागू दिली नाही हे विशेष.