जळगावात पोलीस भरती : 312 उमेदवारांची कागदपत्र तपासणीसह शारीरीक चाचणी
शारीरीक चाचणीत 12 जण तर कागदपत्र पडताळणीमध्ये 3 जण अपात्र
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस शिपाई पदाच्या 128 जागांसाठी जळगाव शहरातील पोलीस मैदानावर शारीरीक चाचणीसह मैदानी चाचणी व कागदपत्र तपासणी अशी प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी एकूण 532 उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीकरीता बोलाविण्यात आले होते. यात 312 उमेदवार हजर राहिले. यात शारीरीक चाचणीत 12 जण तर कागदपत्र पडताळणीमध्ये 3 जण अपात्र ठरल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
पोलीस मैदानावर शारीरीक चाचणी
लेखी परीक्षेनंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या शारीरीक चाचणी, कागदपत्र तपासणी तसेच मैदानी चाचणीला मंगळवारपासून पोलीस कवायत मैदानावर सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी मंगळवारी 537 उमेदवारांना बोलाण्यात आले होते. यात 446 उमेदवार हजर होते. शारीरीक चाचणीत 14 जण तर कागदपत्र तपासणीत 6 जण अपात्र ठरले होते. बुधवारी 532 उमेदवारांना बोलाविण्यात आले होते. यात 312 उमेदवार हजर राहिले. शारीरीक चाचणीत 12 जण तर कागदपत्र पडताळणीमध्ये 3 जण अपात्र ठरले आहेत. प्रत्येक उमेदवाराचे प्रक्रियेदरम्यान व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येत असून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. गुरुवार,11 नोव्हेंबर रोजी महिला व माजी सैनिक उमेदवारांना बोलावण्यात आले आहे. पोलीस कवायत मैदानावर पहाटे पाच वाजेपासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत भरतीची प्रक्रीया सुरु राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी कळविले आहे.