पिंप्राळ्यात बंद घरातून पावणे चार लाखांचा मुद्देमाल चोरीला

जळगाव : बंद घराला टार्गेट करीत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण तीन लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला टार्गेट
पंकज मगन मेहेते (विठ्ठलवाडी, पिंप्राळा परीसर) हे पत्नीसह वास्तव्याला आहे. 2 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पंकज मेहेते हे पत्नीसह घराला कुलूप लावून मुंबईला गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली. घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले तीन लाख 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि सहा हजार रुपयांची रोकड असा 3 लाख 81 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. गुरुवार, 3 मार्च रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास पंकज मेहेते यांनी त्यांचे मेहुणे देविदास अमृत जाधव (आनंदमित्र कॉलनी, पिंप्राळा) यांना फोन करून घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार देविदास जाधव यांनी तातडीने शालक पंकज मेहेते यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याचे उघडकीस आले. देविदास अमृत जाधव (40, रा.आनंद मित्र कॉलनी, पिंप्राळा) यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवार, 3 मार्च रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.