जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदावरून डॉ़ भास्कर खैरे यांना हटविण्यात आले असुन त्यांच्या जागी कोल्हापूर शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ़ तात्याराव लहाने यांनी याबाबत आदेश काढले आहेत. डॉ. गजभिये यांचे कोल्हापूर वैद्यकीय महाविद्यालयात सहा महिन्यांची कारकिर्द वादग्रस्त अशी असुन कोल्हापुरात कोरोनाबाधीतांची वाढती संख्या व वैद्यकीय महाविद्यालयाच्या काराभारात अनागोंदी यामुळे त्यांची उचलबांगडी करण्यात आली आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दोघा अधिष्ठातांची एकाच कारणाने उचलबांगडी
डॉ. खैरे व डॉ. गजभिये या दोघांच्या बदलीच्या कारणही योगायोगाने सारखीच आहेत.
अधिष्ठाता गजभिये व तेथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. केम्पी पाटील यांच्यातील वाद व दोघांमध्ये समन्वय नव्हता. त्याच प्रमाणे डॉ. खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांच्यातही कारभारात समन्वय नसल्याचे गेल्या काही घटनांवरुन समोर आले होते. तसेच जिल्हा रुग्णालयात शासकीय महाविद्यालय झाल्यापासून ही डॉ. चव्हाण व डॉ. खैरे यांच्यातील कलगीतुर्याची चांगलीच चर्चा होती. दुसरे कारण असे की कोल्हापुरातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढ होती. तीच बाब जळगाव जिल्ह्याची सुद्धा आहे.दरम्यान शेवटचे वृत्त तोवर डॉ. गजभिये पदभार स्वीकारलेला नव्हता. याबाबत डॉ. खैरे यांना विचारले असता त्यांनीही पदभाराबाबत माहिती नसल्याचे सांगितले.
कोल्हापूरच्या डॉ़ मिनाक्षी गजभिये यांची बदली जळगावात झालेली आहे़. माझ्या बदलीसंदर्भात अद्याप आदेश नाही. जळगावकरांचे प्रेम व सहकार्य मिळाले. त्याबद्दल आभारी आहे.
– डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता