जळगावात ‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद !

0

जळगाव । पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला, मात्र तणावपूर्ण शांतता कायम होती. गणेश कॉलनीत स्वीट मार्ट व एका दवाखान्यावर झालेली दगडफेक वगळता बंदही शांततेत पाळण्यात आला. बंदला घालबोट लावण्याचा प्रयत्न करणार्‍या तिघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातच सायंकाळी पिंप्राळा-हुडको येथील नागरिकांनी भंतेजी यांच्या मार्गदर्शनाखाली खाली शांततापुर्ण वातावरणात संमजस्यपणा दाखूवन पोलिसांना सहाकार्याची भुमिका दाखवून सामाजिक सलोखा राखण्यास मदत केली. यानंतर मागण्यांचे निवेदन पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना देण्यात आले. यावेळी महिलांनी व चिमुकल्या मुलींनी हे निवेदन दिले.

अधिकारी रस्त्यावर उतरले
मंगळवारी राष्ट्रीय महामार्गावर एस.टी.बसची तोडफोड करुन चालकासह बसला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता, त्यामुळे या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनातर्फे शहरात कडेकोट बंदोबस्त लावला होता. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्यासह सर्व प्रभारी अधिकारी रस्त्यावर उतरले होते. याशिवाय पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणाही कामाला लागल्या होत्या. प्रत्येक चौक, महामार्ग, गर्दीचे ठिकाण, रेल्वे व बस स्थानक, व्यापारी संकुल व मॉल आदी ठिकाणी वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता.

पोलीस बंदोबस्तात रॅली
आंबेडनगर नगरातील भीमसैनिकांनी एकत्र येऊन रेल्वे स्टेशनवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत रॅली काढली. यावेळी रस्त्यावरील गांधी मार्केट व फुले मार्केटमध्ये सुरुअसलेल्या दुकानांकडे धाव घेतल्याने पळापळ झाली होती. या हालचाली लक्षात घेता पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी रॅलीच्या मागे पुढे व मध्यभागी पोलिसांचा ताफा तैनात केला होता. स्वत: सांगळे, शनी पेठचे निरीक्षक प्रवीण वाडिले व शहरचे निरीक्षक प्रदीप ठाकूर हे रॅलीसोबत चालत आले. रेल्वे स्टेशन येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळयाला वंदन व प्रार्थना म्हटल्यानंतर सर्व भीमसैनिकांना पुन्हा आंबेडकर नगरात पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले. तेथे रॅली विसर्जित झाली. यावेळी तणावाची स्थिती कायम होती. तसेच शहरात बंद पाळण्यासाठी देखील कार्यकर्त्यांकडून व्यावसायिकांना विनंती करण्यात येत होत.

विद्यार्थी शाळेत न आल्याने परिक्षा रद्द
बंदला बुधवारी सकाळपासूनच सर्वत्र प्रतिसाद मिळत होता. शहरातील प्रमुख बाजारपेठांसह शाळा, महाविद्यालयांमध्ये शुकशुकाट होते. मंगळवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या बसफेर्या बुधवारी मात्र थांबवण्यात आल्या आहेत. तुरळक वर्दळ वगळता पूर्ण शहरात बंद पाळण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्र घटनेमुळे रान उठले असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले नाही. अनेक शाळांमध्ये दहावीची पुर्व परिक्षा सुरु होत्या. महाराष्ट्र बंद व अपरिहार्य घटना घडत असल्या कारणाने वाहनसेवा बंद होती. तसेच भितीपोटी पालकांनी पाल्यांना शाळेत न पाठविल्यामुळे विद्यार्थ्यांअभावी दहावीची पुर्व परिक्षा रद्द करावी लागली. यानंतर वेळापत्रक ठरवून परिक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे.

दुकाने बंद करण्यासाठी सक्ती
गोलाणी मार्केट, फुले मार्केट, रेल्वे स्टेशन व दाणाबाजार या पसिरात व्यावसायिकांनी स्वयंस्फुर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती, मात्र काही किरकोळ दुकाने सुरु असल्याने ती बंद करण्यासाठी विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून सक्ती केली होती. एकत्रित संख्या जास्त असल्याने भीतीपोटी व्यावसायिकांनी पटापट दुकाने बंद केली. हॉटेल, फरसाण यांची किरकोळ दुकाने सुरु होती. तसेच अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने यावेळी सुरू होती. दुपारी गणेश कॉलनीतील दवाखान व हॉटेलवर दगड फेक करण्यात येवून काच फोडण्यात आली. यामुळे किरकोळ गोंधळ निर्माण झाला होता. परंतू, पोलिसांनी परिस्थिती हाताळल्यानंतर वातावरण शांत झाले होते.

विद्यार्थी अभावी शाळा बंद
जळगाव शहरात शिक्षणासाठी आजुबाजुच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी येत असतात. ग्रामीण भागातून येणार्‍या विद्यार्थ्यांसह शहरातील विद्यार्थी देखील खाजगी बसेस व रिक्षाने शाळेत येत असतात. मंगळवारपासून सरकारी व खाजगी वाहनांवर होणारे हल्ले लक्षात घेता वाहने रस्त्यावर आलीच नाही. शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतुक करणारी वाहने आली नसल्याने व पालकांनी तणावपुर्ण वातावरण असल्याने पाल्यांना शाळेत न पाठविणे पसंत केले त्यामुळे शहरातील बहुतांश शाळा विद्यार्थ्यां अभावी बंद होत्या.

6 रोजी होणार परिक्षा
ला.ना.सार्वजनिक विद्यालयात बुधवारी 3 रोजी हिंदी-संस्कृत विषयाची पूर्व परिक्षा घेण्यात येणार होती. विद्यार्थ्यांना याबाबत सुचनाही करण्यात आलेली होती. मात्र वाहन बंदमुळे व पालकांनी न पाठविल्याने विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाही. त्यामुळे ही परिक्षा रद्द करण्यात आली असून शनिवारी 6 रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. नियमीत वेळेप्रमाणे शिक्षण शाळेत येऊन हजर होते.

अफवांवर विश्‍वास ठेवू नका
बुधवारी बंदची हाक दिल्याने सकाळ विभागातील शाळांमध्ये अत्यल्प विद्यार्थी आलेत. ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला वाहन बंदमुळे बाजार समितीत आला नाही. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला असून खबरादारीच्या उपाय योजना करण्यात येऊन प्रशासन अर्लट होते. जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पडता बंद मध्ये शांततेने सहभागी व्हावे, असे आवाहन बंद पुकारणार्‍यांनी संघटनांनी केले होते.

एसटी महामंडळाचे 28 लाखांचे नुकसान
जिल्ह्यांत एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाच्या 22 बसेस जमावाकडून फोडण्यात आल्यात. या तोडफोडीत 15 लाखांचे नुकासन झाले आहे. तर काल व आज फेरी रद्द झाल्याने 37 लाखांचे नुकासन झाले आहे. आज 1152 फेर्‍या रद्द करण्यात आल्या असून यात अंदाजे 28 लाखांचे नुकसान झाले आहे. तर पाचोरा डेपोतून सकाळपासून एकही गाडी धावली नसल्याचे समोर आले आहे. जळगाव नवीन बस स्टँडमध्ये प्रवासी बस वाहतूक सुरू होईल या अपेक्षेन बसून होते. तर काही प्रवाशांनी चौकशी खिडकीवर माहिती घेतली असता त्यांना बस सेवा सुरू होणार नाही असे स्पष्ट सांगण्यात येत होते.

मॉल, सराफ बाजार बंद
बंदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख लहान मोठे मॉल, सराफ बाजार, दाणा बाजार, कापड बाजार यासह मुख्य बाजारपेठ बंद होती. सकाळी दहा वाजता सुरु झालेली काही दुकाने नंतर बंद झाली होती. दुपारनंतर काही दुकाने सुरु झाली होती. मुख्य बाजारपेठ वगळता सिंधी कॉलनी, पिंप्राळा, आयोध्या नगर, गणेश कॉलनी या भागात बहुतांश दुकाने सुरु होती. यातच सायंकाळी बंद मागे घेण्यात आल्यानंतर शहरातील बहुतांश दुकाने ही सुरू होती. त्यानंतर विस्कळीत जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून आले.

संशयितांवर कारवाई करा
पिंप्राळा हुडको येथे नागवंशी संघ, महाप्रजापती महिला संघ व नागवंशी नगर यांच्यातर्फे भंतेजी अश्‍वजित यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगाव येथील संशयितांना अटक करून त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांना शांततापुर्ण वातावरणात दिले. यावेळी पोलिस निरिक्षक बापुसाहेबर रोहम, तहसिलदार अमोल निकम उपस्थित होते. तर मोठ्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते. यावेळी मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, त्वरीत खटला न्यायालयात चालवावा, सीबीआय चौकशी करावी, ना दुरूस्त बसेस देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी, निरपराध लोकांवर दाखल गुन्हे माघे घेण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.