जळगाव, धुळे जिल्ह्यातील पीएफ धारकांना मोठा दिलासा
भुसावळ- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अशा चार जिल्ह्यांसाठी नाशिक येथे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (ईपीएफओ) चे उपविभागीय कार्यालय असल्याने तेथे जाण्या-येण्यासाठी कर्मचार्यांना मोठा आर्थिक भूर्दंड बसून मानसिक त्रासही होत होता मात्र आता जळगाव येथे महिनाभराच्या आत हे कार्यालय सुरू होणार असल्याने नववर्षात रेल्वेसह ऑर्डनन्स फॅक्टरी, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परीषद, प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, वीज कर्मचारी, पोलीस खाते, संरक्षण खात्यासह सरकारी व खाजगी क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधीचे खाते असलेल्या कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
खासदारांच्या पाठपुराव्याला यश
खासदार रक्षा खडसे या भविष्य निर्वाह निधी उपविभागीय कार्यालय जळगाव जिल्ह्यात व्हावे यासाठी प्रयत्नशील होत्या यासाठी त्यांनी सतत पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू होता. 9 जानेवारी रोजी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा.डॉ.सुनील नेवे सर श्रम व रोजगार (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री संतोष गंगवार आणि केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त सुनील बर्थवाल यांची भेट घेतली आणि नोकरदारांना होणार्या गैरसोयीची कल्पना दिली. झालेल्या चर्चेनंतर धुळे व जळगाव जिल्ह्यातील नोकरदारांना सोयीस्कर व्हावे यासाठी जळगाव येथे भविष्य निर्वाह निधीचे नवीन उपविभागीय कार्यालय सुरू करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले असून महिनाभरात हे कार्यालय कार्यान्वित होणार असल्याचे आश्वासन प्रसंगी देण्यात आले.