जळगाव- शहरात विविध भागात किरकोळ कारणांवरुन तरुणींसह महिलांचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी समोर आल्या आहेत. एका घटनेत विद्यार्थीनीचा समावेश आहे. या घटनांबाबत संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असून या दोन घटनांमधील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनांमुळे जळगावातील महिला तरुणी असुरक्षित झाल्याचे अधोरेखित झाले आहे. एका घटनेत तरुणाने चक्क प्रेमाचा स्विकार करावा म्हणून हातावर ब्लेड मारुन घेतले, छातीवर तरुणीचे नाव लिहून तिला फोटो मोबाईल पाठवून बदनामी करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
रामेश्वर कॉलनीत घराच्या कंपाउडमध्ये भाजी फेकल्याचा जाब विचारल्याचा राग येवून तरुणाने 30 वर्षीय महिलेशी अश्लिल वर्तन करुन मारहाण केल्याची घटना घडली. तसेच सुप्रिम कॉलनीत बचत गटाचे पैसे घ्यायला जात असलेल्या 22 वर्षीय विवाहितेला रस्त्यात अडवून संशयिताने अश्लिल वर्तन केले. तिसर्या घटनेत अनेक वर्षापासून तरुणीच्या मागावर असलेल्या तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला अश्लिल हातवारे करुन, विनयभंग केला तसेच प्रेमाचा स्विकार न केल्यास तिच्यासह कुटुंबांला जीवे मारण्याची धमकी दिली. या तिनही घटनांप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विनयभंगांचा गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी दोन घटनांमधील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौथ्या घटनेत विद्यार्थीनीने एका फाऊंडेशनमध्ये शिक्षण घेत आहे. शिकत असलेल्या कोर्ससाठी अनुदान मिळेल काय, असे विचारणा केली असता, वाद झाला. या वादातून विद्यार्थीनीने अरेरावी केली व इतरांना याबाबत माहिती दिली म्हणून संचालकाने विनयभंग केल्याचे समोर आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.