जळगाव प्रतिनिधी । संत मुक्ताबाई राम पालखीचे शहरातील संत अप्पा महाराज समाधी याठिकाणी आगमन झाले.
श्रीराम मंदिर संस्थानचे विद्यमान गादीपती मंगेश महाराज जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही पालखी, पायी वारी काढण्यात आली होती. श्रीराम मंदिर संस्था संचलित श्रीसंत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूरहून मेहरूण येथे आगमन झाले. त्यानंतर मंगळवारी सकाळी मेहरूण परिसरातील श्रीराम मंदिरात देवदत्त मोरदे यांचे कीर्तन पार पडले. शहरात विविध ठिकाणी पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. सायंकाळी सद्गुरू अप्पा महाराज समाधी मंदिर येथे आगमन झाल्यावर अप्पा महाराज समाधी मंदिरातील पुजारींच्या हस्ते पालखीचे विधीवत पूजन करून आरती करण्यात आली.
जुलै महिन्यात शहरातून पंढरपूरकडे पालखीचे प्रस्थान झाले होते. पालखीने पंढरपूरपर्यंतच्या प्रवासात औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी मुक्काम केला. मुक्ताई पालखी सद्गुरू बाळानंद स्वामी महाराज समाधी मंदिर दुसखेडे, म्हसोबा देवस्थान कालीघाट, खुलताबाद, कालीमठ, वेरुळ, शनिशिंगणापूरसह श्री क्षेत्र प्रवरानगर, ग्रंथराज ज्ञानेश्वरी जन्मस्थान, भैरवनाथ दर्शन, कमलादेवी दर्शन, सूर्यनारायण देवस्थान टेंभूर्णी आदी तीर्थस्थळांचे दर्शन घेत पालखीचा प्रवास पूर्ण झाला.