जळगावात राज्यव्यापी शेतकरी परिषद

0

जळगाव । शासनाने 34 हजार कोटीची शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र कर्जमाफी करतांना अनेक अटीशर्ती टाकल्या आहेत. अटीशर्तीं बघता राज्यातील शेतकर्‍यांना 34 हजार कोटींपैकी केवळ 10 हजार कोटींचीच कर्जमाफी होणार आहे. शासनाने फसवी व खोटी कर्जमाफी जाहीर केली असून शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकरी सुकाणू समितीने केले आहे. सरसकटत कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यव्यापी शेतकरी मोर्चानंतर आता राज्यव्यापी शेतकरी परिषद घेण्यात येत असून 26 सप्टेंबर रोजी जळगाव शहरात ही परिषद होत आहे. शेतकरी कर्जमाफी मंत्री गटाच्या समितीचे जिल्ह्यांचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असून जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सदस्य आहेत. त्यादृष्टीने राज्यव्यापी शेतकरी परिषदेसाठी जळगाव शहराची निवड करण्यात आली असल्याची माहिती शेतकरी सुकाणू समिती सदस्या प्रतिभा शिंदे यांनी दिली. राज्यव्यापी शेतकरी परिषदेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीतनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना त्या बोलत होत्या.

50 हजार शेतकरी येणार
शासनाने केवळ दीड लाखाची कर्जमाफी केल्याने शेतकर्‍यांवर कर्जाचा बोजा कायम राहणार असल्याने सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यव्यापी परिषद होत आहे. शासनाला जागे करण्यासाठी ही परिषद होत असून या परिषदेला 50 हजार शेतकरी सहभागी होतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. परिषदेत सहभागी होण्यासाठी सुकाणू समितीच्या वतीने जिल्ह्यातील तीनशे गावात जावून तरुणांना जागृत करण्याचे काम करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमचा लढा न्याय हक्कासाठी असल्याने जास्तीत जास्त संख्येने तरुणांनी या परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक संघटनांचा पाठींबा
राज्यव्यापी परिषदेच्या नियोजनासाठी यशोदया सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बीड येथील सुशिला बोराळे, किशोर ढमाळे, संजय पाटील, माऊली हरनवळ, सचिन धांडे, मुकुंद सपकाळ, नरेंद्र पाटील, किशोर महाजन, भरत बारेला, संजय घुगे, दिलीप बोंडे, सुजीत पाटील उपस्थित होते. शेतकरी परिषदस स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, भारत मुक्तीमोर्चा, संभाजी ब्रिगेड, विद्रोही साहित्य चळवळ, खान्देश कामगार संघटना, सत्यशोधक संघटना, रघुनाथ पाटील आणि शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेंनी पाठींबा दिला असल्याने परिषदेत या संघटनांचा सहभाग असणार आहे.