जळगावात रानडुकराचा धुमाकूळ

0

जळगाव। जळगाव। ग्रामीण भागात शेत शिवारात आढळणार्‍या रानडुकराने शहरात धुमाकुळ घातले आहे. शुक्रवारी शहरातील विद्युत कॉलनीत सकाळी 11.30 वाजता रानडुकराने जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील नीलेश पाटील हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला. दरम्यान, या रानडुकरामुळे परिसरात महिला व लहान मुलांमध्ये भीती निर्माण झाली. रहिवासी भागात रानडुकर शिरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या शासकीय अभियांत्रिकीच्या दिशेने हे रानडुकर विद्युत कॉलनीत शिरले. नागरीवस्तीत आल्याने महिलांमध्ये घबराट निर्माण झाली.

अशोक जोशी यांच्या खोलीत भाड्याने राहत असलेला नीलेश पाटील हा विद्यार्थी बाहेरुन घरी येत असताना या रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने नीलेश बाजुला झाल्याने त्याला किरकोळ जखम झाली. नागरिक रानडुकरामागे धावले असता हे रानडूकर गल्लीबोळातून पळत सुटले. अशोक जोशी यांनी रामानंद नगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

वनविभागाशी काही जणांनी संपर्क साधला होता, मात्र त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळाला नाही. शहराला लागून असलेला सावखेडा शिवार किंवा मोहाडी रोड या परिसरातून हे रानडूकर शहरात आले असावे अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. जंगली प्राणी शहरात घुसल्यामुळे नागरिकांच्या रक्षणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बंदोबस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.