In Jalgaon, A Child was Killed In A Car Race जळगाव : मेहरुण ट्रॅकवर दोन कारमध्ये रेस (शर्यत) लागल्यानंतर भरधाव कारने 11 वर्षीय चिमुकल्याला धडक दिल्याने बालकाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना रविवार, 28 ऑग्स्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता घडली.
विक्रांत संतोष मिश्रा (11, रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अपघात प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना अटक करण्यात आली.
ट्रॅकवर भरधाव कारने उडवले
विक्रांत संतोष मिश्रा हा चिमुकला रविवारी दुपारी चुलतभाऊ जितेंद्रबरोबर तलावाच्या काठी असलेल्या ट्रॅकवर सायकल चालवण्यासाठी आला असता दुपारी घराकडे परतत असताना ट्रॅकवर एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी भरधाव निघालेल्या दोनपैकी एका कारने (क्रमांक एम.एच. 19 बी.यू.6606) विक्रांतला जोरदार धडक दिल्याने सायकलसह उंच फेकला गेला आणि झाडावर ठोकला जावून जमिनीवर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जखमी झाला. ट्रॅकवर फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
कुटुंबाने फोडला टाहो
विक्रांत हा अजिंठा चौफुलीजवळील सुरेशदादा शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये इलेट्रॉनिक्सचे दुकान चालवणारे संतोष मिश्रा यांचा एकूलता एक मुलगा होता. विद्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता चौथीत तो शिक्षण घेत होता. त्याच्या या अकाली मृत्यूने कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे.