जळगाव लाचलुचप्रत प्रतिबंधक विभागाची एकाच दिवशी कारवाई
जळगाव:- मिळकतीच्या खरेदी खताच्या नोंदीची साक्षांकीत प्रत देण्यासाठी जळगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील शिपायासह खाजगी पंटरला दोन हजारांची लाच घेताना तर धरणगाव तालुक्यातील खर्दे बु.॥ येथील ग्रामसेवकासह रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर मंजूर झाल्यानंतर अनुदानाचा धनादेश देण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. एकाच दिवशी झालेल्या या कारवाईने लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगावचा लाचखोर शिपायासह पंटर जाळ्यात
यावल तालुक्यातील सावखेडासीम येथील तक्रारदाराच्या आजोबाच्या नावे असलेल्या मिळकतीच्या खरेदी खताच्या साक्षांकीत नोंदी देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणार्या जळगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयातील दप्तरबंद अरुण विठ्ठल पाटील (59) व खाजगी पंटर राजेंद्र तापीराम सोनवणे (56, जळगाव) यांना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई जळगावे एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नीता कायटे व सहकार्यांनी केली.
खर्देचा लाचखोर ग्रामसेवक जाळ्यात
धरणगाव तालुक्यातील खर्दे बु.॥ येथील लाचखोर ग्रामसेवक सतीश सी.पाटील (35) याने गावातील तक्रारदाराकडून रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिर अनुदानाचा कुशल धनादेश देण्यासाठी दोन हजार 500 रुपयांची मागणी केली होती. दोन हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर कार्यालयात सापळा लावून आरोपीला लाच घेताना जळगाव एसीबीने सोमवारी दुपारी रंगेहाथ अटक केली. दरम्यान, दोघाही आरोपींच्या घर झडतीत काहीही आढळून आले नाही.