जळगावात वाढदिवशीच सहाय्यक फौजदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

0

शहर पोलीस ठाण्यात होते कार्यरत ; सहकार्‍यांनी मध्यरात्री केक कापून केला वाढदिवस साजरा

जळगाव- शहर पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत असताना रात्री एक वाजेच्या सुमारास हृदयिवकाराच्या झटक्याने सहाय्यक फौजदार सुरेश रघुनाथ पाटील वय 57 रा. चंदू आण्णा नगर यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी सुरेश पाटील यांचा वाढदिवस होता, दुपारी कुटुंबियांनी तर रात्री शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षकांसह सहकार्‍यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला होता. यानंतर मध्यरात्री काळाने त्याच्यावर झडप घातली. घटनेने जिल्हा पोलीस दलाल हळहळ व्यक्त होत आहे.

मूळ धरणगाव तालुक्यातील नांदेड येथील सुरेश पाटील हे रहिवासी आहेत. दहा ते 15 वर्षापासून ते निमखेडी शिवारातील चंदू आण्णानगरात वास्तव्याह होते. पत्नी उज्वला, मुले हितेंद्र, महेंद्र व हर्षल असा त्यांचा परिवार आहे. हितेंद्र हा पोलीस शिपाई म्हणून जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत आहे. तर महेंद्र हा शिरपूर येथे बँकेत नोकरी करतो. हर्षल हा लहान असून तो मतिमंद आहे. हितेेंद्र व महेंद्र दोघे विवाहित आहे. हितेंद्र एक मुलगा तर महेंद्रला एक मुलगी आहे. महेंद्र हा पत्नी व मुलीसह शिरपूर येथे वास्तव्यास आहे.

कर्तव्य बजावतांनाच मध्यरात्री काळाची झडप

शुक्रवारी ठाणे अंमलदार म्हणून सुरेश पाटील कर्तव्यावर होते. शहर पोलीस ठाण्यात सहकार्‍यांनी शुक्रवारी रात्री 10.30 वाजता केक कापून सुरेश पाटील यांचा 57 वाढदिवस साजरा केला. यावेळी पोलीस निरिक्षकांसह सर्व कर्मचारी हजर होते. यानंतर मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. कर्मचार्‍यांनी त्यांना तत्काळ ऑर्किड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याठिकाणी उपचार सुरु असतांना त्यांची प्राणज्योत मालवली. सुरेश पाटील यांनी पाचोरा, रावेर तालुक्यातील निंभोरा, नशिराबाद व जळगाव येथे सेवा बजावली आहे.