जळगाव । शिवरायाचे आठवावे ते स्वरूप , स्वराज्याची शान शिवबा , शिवबा तुम्हा जन्म मुळे अशा विविध पोवाडे ,सांस्कृतिक कार्यक्रमानी जळगाव नगरी दुमदुमली होती. राजे शिवछत्रपती यांची जयंती हिंदू धर्माच्या तिथीप्रमाणे आज मोठ्या जल्लोषात व उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळ पासून महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तानी शिवतीर्थावर गर्दी केली होती. आपल्या स्वराज्य निर्मात्याला वंदन करण्यासाठी संपूर्ण शिवतीर्थ परिसरात गणेश ,दुर्गा मंडळाच्या वतीने माल्यार्पण करीत जय घोषणा देण्यात येत होत्या. शिवसेना , स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते . मिरवणुका मध्ये शिवशाही युगातील विविध देखावे दाखविण्यात आले. विविध वेशभूषा या एतेहासिक युगातील दाखविण्यात आल्या. ढोल-ताशा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. शहरातील विविध सामाजिक संस्था ,मंडळाच्या वतीने शिवरायांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संपूर्ण जळगाव शहर भगवामय झाले होते.
स्वराज्य निर्माण सेनेचे अभिवादन
तिथी प्रमाणे असलेल्या शिवजयंती निम्मिताने स्वराज्य निर्माण सेनेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 11 वा पासुन दुग्धाभिषेक विधिवत धार्मिक पूजा करण्यात आली .या वेळी महापौर नितीन लढ्ढा उपस्थित होते. आमदार राजू मामा भोळे च्या हस्ते मानाचे भगवे उपरणे अर्पण करण्यात आले तसेच पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. पक्ष्यांना 1700 प्याऊ या वेळी वाटप करण्यात आले. महेश सपकाळे,विशाल जगदाळे,सागर महाडिक,ललित सोनावणे,परेश सिनकर,गणेश शेटे ,करण पाटील,संतोष पाटील,किरण महाजन सुशील इंगोले,आकाश काळे,मंगेश राठोड आदि उपस्थित होते.
छत्रपती शिवाजीचा जयघोष
जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला. या घोषणांनी गोलाणी मार्केट दणाणून गेले होते. शिवसेना कार्यालयापासुन भव्य मिरवणूकीला सुरूवात झाली. मिरवणूकीत राजे छत्रपतींचे सजीव आरास साकारण्यात आले होते. तसेच बालशिवाजी घोड्यावर स्वार झाले होते. सोबत मावळे उंटावर आरूढ झालेल होते. महिला आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी भगवा फेटा घालुन मिरवणूकीत सहभागी झाले होते.
युवासेनेकडून अभिवादन
शिवतिर्थावरील अश्वारूढ राजे छत्रपतींच्या पुतळ्यास युवा सेनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. शिवसेना महानगर प्रमुख कुलभुषण पाटील युवासेना उपमहानगर प्रमुख विनायक कोळी, शिवसेना माजी महानगर प्रमुख गजानन मालपुरे, पंकज भदाणे, जितु साळुंखे तसेच शाखा प्रमुख स्वप्नील जावळे, प्रशांत सोनवणे, विपुल शंखपाळ, विपुल जोशी, गणेश वाघ, प्रणय पाटील आदी युवासैनिक उपस्थित होते.
महानगर शिवसेनेतर्फे जल्लोष
शिवसेना महानगर शाखेतर्फे शिवाजी महाराजाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना कार्यालयात छत्रपतींच्या प्रतिमेला माजी आमदार सुरेशदादा जैन ,महापौर नितीन लढ्ढा यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तिथीप्रमाणे शिवसेना शिवजयंती साजरी करण्यात आली. महापालिका परिसरातील गोलाणी मार्केट येथील शिवसेना कार्यालयात शिवजयंती निमित्त सकाळ पासुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शिवसेना पदाधिकार्यानी माजी आमदार सुरेश जैन यांना भगवा फेटा परिधान केला. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनिल महाजन व जिल्हा परिषदेचे नुतन जि.प. सदस्य प्रताप गुलाबराव पाटील, चिंतामण जैतकर, महानगर प्रमुख गणेश सोनवणे उपस्थित होते. यावेळी मिरवणुकी मध्ये शिवसेनेच्या पदाधिकार्यानी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता. तसेच मिरवणुकीत बाल-गोपालांनी विविध वेशभूषा परिधान करुन मिरवणूकीत सहभाग नोंदविला होता.