जळगावात संक्रांतीला पतंगाने घेतला दोघा बालकांचे जीव
कुसुंब्यात शॉक लागल्याने तर जळगावात पतंग उडवू न दिल्याने बालकाची आत्महत्या
भुसावळ/जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वीज तारांमध्ये पतंग अडकल्याने तो काढताना 10 वर्षांच्या मुलाला विद्युत तारांचा शॉक लागल्याने मृत्यू झाला तर जळगावच्या कांचन नगरात पतंग उडवू न दिल्याने बालकाने आत्महत्या केली.
कुसुंब्यात शोककळा
कुसुंबा येथे शुक्रवार, 14 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हितेश ओंकार पाटील (10, रा.गणपती नगर, कुसुंबा, ता.जळगाव) हा बालक मित्रांसोबत कुसुंबा गावातील मैदानावर पतंग उडवायला गेला असता अचानक पतंग विजेच्या तारांमध्ये अडकला व पतंग ओढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेच्या तारेचा शॉक लागला. यावेळी ग्रामस्थांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील कळसकर यांनी त्यास मृत घोषित केले.
पतंग उडवू न दिल्याने अल्पवयीन बालकाची आत्महत्या
संक्रांतीच्या सणालाच जळगावच्या कांचन नगर भागातील अवघ्या 13 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. यश रमेश राजपूत (13, कांचन नगर, जळगाव) असे मृत बालकाचे नाव आहे. पतंग उडवू देण्यासाठी जावू न दिल्याने बालकाने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले.
बालकाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
शुक्रवार, 14 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास यश राजपूत या बालकाने राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. मुलाचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात हंबरडा फोडला. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, मयत यशचे वडील रमेश सुकलाल राजपूत (रा.कांचन नगर) हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बारदानचे काम करतात. मुलाने केलेल्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा मानसिक आघात बसला आहे.