जळगाव कारागृह अधीक्षकांसह-कर्मचार्यांचीही होणार चौकशी
जळगाव- धुळे शहरातील महामार्ग भूसंपादन फसवणूकप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी शिवसेना महानगर प्रमुख सतीश महाले यास अटअक करण्यात आली. आरोपी जळगाव कारागृहात असतना त्याने गुरुवारी छातीत दुखत असल्याचा बहाणा केला होता मात्र आरोपीने उपचार न घेता खाजगी वाहनातून शहरात भ्रमंती केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर महाले याच्या सुरक्षेकरिता कर्तव्यावर असलेल्या दोन पोलिस कर्मचार्यांना दोषी धरत पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी त्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. पोलिस नाईक सुनील सुभान तडवी (बक्कल नंबर 862) व पोलिस शिपाई मनोज भगवान पाटील (बक्कल नंबर 3347) अशी निलंबित कर्मचार्यांची नावे आहेत. दरम्यान, महाले याने बुधवारी छातीत दुखत असल्याचा बहाणा करीत दुपारी 11.48 वाजता जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर एमएलसी रजिस्टरवर एन्ट्री मात्र दिवसभर कुठलेही उपचार घेतले नसल्याची माहिती आहे.
स्थानिक गुन्हे शाखेकडे चौकशी
दोघा पोलिसांना निलंबित केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील कुराडे यांच्याकडे देण्यात आली आहे. बुधवारी दुपारी महाले कारागृहातून बाहेर निघाल्यानंतर कारागृहात जाईपर्यंत ज्यांना-ज्यांना भेटला वा फोनवर बोलला, त्या सर्वांचे जबाब घेतले जाणार आहेत. दिवसभरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येणार आहेत. यात कारागृहातील कर्मचारी, अधिकारी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. महाले याने बंदी असताना खासगी वाहनातून फिरणे, मोबाइलवर बोलणे, असे गुन्हे केले असल्याने त्याच्यावर ही गुन्हा दाखल होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.