जळगावात स्त्री जातीचे मृत अर्भक उकीरड्यावर फेकून माता पसार

रामानंद नगर पोलिसात अज्ञात मातेविरोधात गुन्हा : पोलिसांकडून तपासाला वेग

जळगाव/भुसावळ : 4 ते 6 महिन्याचे स्त्री जातीचे बाळ रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी नगरात असलेल्या उकीरड्यावर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाळाच्या अज्ञात आईविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उकीरड्यावर अर्भक फेकून माता पसार
याबाबत सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या राजीव गांधी नगर परीसरातील उकीरड्यावर अंदाजे 4 ते 6 महिन्याचे स्त्री जातीचे बाळ आढळून आल्याची घटना मंगळवार, 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उघडकीला आली. भंगार वस्तू उचलणार्‍या काही मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पीएसआय शांताराम पाटील, कॉन्स्टेबल हरीश डोईफोडे, विजय जाधव, निलेश बच्छाव, सुशिल चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने बाळाला उचलून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांना बाळाला मयत घोषीत केले. या घटनेबाबत रामांनद नगर पोलिसात बाळाच्या अज्ञात आईविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.