जळगाव : शहरातील रींग रोडवरील स्पा सेंटरमध्ये काम करणार्या 28 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडीता हरीयाणा राज्यातील रहिवासी
जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीयाणा राज्यातील 28 वर्षीय विवाहित महिला ही रोजगारानिमित्त जळगावात वास्तव्यास आली आहे. जळगावच्या रींग रोडवरील सी सल्ट स्पा सेंटरवर नोव्हेंबर 2021 पासून तीने नोकरीला सुरूवात केली. दत्तू लक्ष्मण माने (रा.नाशिक) हा स्पा सेंटरचा मालक असून या स्पा सेंटरमध्ये दीपक बडगुजर आणि पंकज जैन हे मॅनेजर आहेत. 24 फेब्रुवारी रोजी सेंटरचे मालक दत्तू लक्ष्मण माने हा नाशिकहून जळगावातील सेंटरवर आल्यानंतर सायंकाळी पाच वाजता 28 वर्षीय महिला एकटी असतांना दत्तू माने याने महिलेकडून मसाज करून घेत नंतर जबरदस्तीने अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितला तर उरलेला पगार देणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर दुकानातील मॅनेजर दीपक बडगुजर आणि पंकज जैन यांनीदेखील अंगाला हात लावून विनयभंग केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकारानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आले.
जळगाव जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा
या प्रकरणी पीडीतेने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी दत्तू लक्ष्मण माने (रा.नाशिक), दीपक बडगुजर आणि पंकज जैन (दोन्ही रा.जळगाव) यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.