जळगावात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलनावर कार्यशाळा
जळगाव शहरात एसीबीच्या संपर्क क्रमांकाचे हॅण्डबिल नागरीकांना वाटप
जळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटतर्फे डी.एन.सी.कॉलेजमध्ये एसीबीचे जळगाव पोलिस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांनी 13 ते 15 ऑगष्ट 2022 या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबवण्याबाबत आवाहन केले शिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यप्रणाली व भ्रष्टाचाराचे निर्मूलन या विषयावर उपस्थितांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
बॅनर लावून जनजागृती
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष होत असल्याने केंद्र शासनाच्या सूचनेनुसार हर घर झेंडा हा उपक्रम राबवण्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्रि क्रमांक 1064 व कार्यालयाचा संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी नमुद असलेले बॅनर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव कार्यालयाच्या दर्शनी भागावर व कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले.
शहरात हॅण्डबिलाचे वाटप
जळगाव शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कार्यप्रणाली, भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन, बसस्टॅण्ड भागात उपस्थितांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक 1064 व जळगाव कार्यालयाचे संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी नमुद असलेले हॅन्ड बिल वाटप करण्यात आले.
जळगाव शहरात सायकल रॅली
रविवारी सकाळी सहा वाजता जळगाव शहरातील भाऊंचे उद्यान काव्यरत्नावली चौक ते मेहरूण तलावपर्यंत सायकल रॅली काढण्यात येणार आहे. ही सायकल रॅली मेहरूण तलावाजवळ संपल्यानंतर या ठिकाणी लाचलुतपत प्रतिबंधक कायद्याबद्दल व कामकाजासंदर्भात तसेच भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती बाबत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक शशीकांत पाटील कळवतात.