जळगाव- औरंगाबाद बसमध्ये चढताना महिलेची पर्स लांबविली

0

जळगाव। जळगाव-औरंगाबाद बसमध्ये चढत असतांना चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधील 1 लाख 30 हजार रुपयांच्या दागिन्यांसह रोकड लांबविली. ही घटना 30 मे रोजी शहरातील नवीन बसस्थानकावर घडली. दरम्यान, याप्रकरणी गुरूवारी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छायाबाई भगवान कन्हेरकर (वय-36) ह्या ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहिवासी आहेत. 31 मे रोजी छायाबाई यांच्या सख्या भाचीचे जामनेर तालुक्यातील पहुर येथे लग्न होते. त्यामुळे त्या 30 मे रोजी सकाळी त्यांच्या आई जनाबाई, नणंद प्रमिलाबाई, जेठाणी चंद्रकला कन्हेरकर यांच्यासह डोंबिवली येथून रेल्वेने जळगावसाठी निघाल्या. दुपारी 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यानात जळगावात पोहाचल्यानंतर त्या नवीन बसस्थानकावर आल्यानंतर परिसरात असलेल्या एका निंबाच्या झाडाखाली सर्वजण बसले. त्यावेळी रेल्वे टिकीट पर्समध्ये ठेवण्यासाठी त्यांनी पर्स उघडल्यानंतर त्यात त्यांनी दागिने ठेवलेली व रोकड ठेवलेली लहान पर्स होती.

तिकीटांचे पैसे काढताना चोरी आली लक्षात
दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास जळगाव- औरंगाबाद ही बस फलाटावर आल्यानंतर सर्वजण बसमध्ये बसण्यासाठी चढले. मात्र, प्रवाश्यांनी बसमध्ये चढण्यासाठी एकच गर्दी केल्याने या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने छायाबाई यांच्या पर्समधील 1.30 हजार रुपये किंमतीचे दागिने व साडेतीन हजार रुपये ठेवलेली लहान पर्स चोरून नेली. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पैसे लागत असल्याने छायाबाई यांनी पर्स उघडल्यानंतर त्यांना त्यांची लहान पर्स दिसून आली नाही. यानंतर त्यांना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने पर्स लांबविल्याचे लक्षात येताच दागिने व पैसे ठेवलेली पर्स चोरीला गेल्याची खात्री झाली. यानंतर आज गुरूवारी छायाबाई कन्हेरकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द साडेतीन हजार रुपयांची रोकड तसेच 60 हजार रुपये किंमतीचे 3 तोळे सोन्याची मंगळपोत, तर 70 हजार रुपये किंमतीची सोडतीन तोळे सोन्याची मंगळपोत चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.