जळगाव-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग

0

मुंबई | केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांपूर्वी जळगाव आणि औरंगाबादेत दिलेल्या 18 हजार कोटींच्या रस्ते विकास निधीच्या आश्वासनाची अखेर ‘पूर्ती’ केली आहे. जळगाव-अजिंठा-औरंगाबाद हा रस्ता आता राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडे (NHAI, एनएचएआय – न्हाई) हस्तांतरित करण्यात आला आहे. ‘न्हाई’ने 1580 कोटी रुपये खर्चून या 150 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास मंजुरी दिली आहे. हा रस्ता जळगाव ते फुलंब्रीपर्यंत तीन पदरी तर तिथून पुढे औरंगाबादपर्यंत चार पदरी केला जाईल. नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी, 29 जुलै रोजी सिल्लोड येथे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन होईल.

पर्यटकही होते नाराज
गेले काही वर्षे जळगाव-औरंगाबाद रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. ‘पीडब्ल्यूडी’ला हा रस्ता सांभाळण्यात पूर्ण अपयश आले होते. अजिंठा लेणी पाहण्यासाठी या रस्त्यावरून जात असलेल्या लाखो परदेशी पर्यटकानीही राज्य सरकारकडे या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर गेली तीन वर्षे औरंगाबाद-अजिंठा रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, रस्त्याची स्थिती आणि पर्यायाने पर्यटकांच्या नजरेतील राज्य सरकारची प्रतिमाही सुधारत नव्हती.

‘पीडब्ल्यूडी’चे अपयश
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार, या खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुळकर्णी यांनी स्वत: अनेकदा या रस्त्यावरून प्रवास करून खड्डे अनुभवले आणि धक्के खाल्ले. कुळकर्णी यांनी रस्त्याची वारंवार पाहणी करून ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांना आदेशांवर आदेश दिले, डेडलाईन घालून दिल्या. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार, मुख्य अभियंता हेमंत पगारे, प्रवीण किडे आणि अशोक ससाणे यांनीही पाहणी’नाट्या’त साथ-संगत दिली. मात्र औरंगाबाद-अजिंठा रस्ता खड्ड्यातून काही बाहेर येऊ शकला नव्हता. चंद्रकांत पाटील यांनी डागडुजीसाठी तत्काळ निधीची घोषणा करून हा रस्ता काही वेळा थातुर-मातुर दुरुस्तही करण्यात आला होता.

‘न्हाई’ने दिली वर्क ऑर्डर
या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येईल, असे आश्वासन दोन वर्षांपूर्वीच्या जळगावातील कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी दिले होते. तेव्हापासून ‘पीडब्ल्यूडी’च्या निष्क्रीयतेतून राज्य सरकारला रस्त्याची अवस्था चांगली राखण्यात आलेल्या अपयशामुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करावा, अशी मागणी जोर धरू लागली होती. त्यानुसार अखेर आता जळगाव-औरंगाबाद रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा बहाल करण्यात आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निकषानुसार हा रस्ता तीनपदरी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘न्हाई’ने निविदा प्रक्रिया राबविली. त्यात कंत्राटदार निश्चित झाले आणि ‘वर्क ऑर्डर’ही (कार्यारंभ आदेश) निघाले आहेत.

चंद्रकांतदादा होते आग्रही
केंद्र सरकारच्या दळणवळण मंत्रालयाने (एमओआरटीएच) वर्षभरापूर्वी देशभरातील 3,883 किलोमीटर लांबीचे रस्ते राष्ट्रीय महामार्ग करण्याची योजना आखली होती. तेव्हा चंद्रकांत पाटील यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणाचे (एमएसआरटीसी) उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली होती. विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करून राज्यातील 16 रस्ते राष्ट्रीय महामार्गात समाविष्ट करण्याची विनंती केंद्राला करण्यात आली होती. त्यात जळगाव-औरंगाबाद-नाशिक रस्त्याचाही समावेश होता. याशिवाय कराड-चिपळूण-गुहागर, पुणे-मुळशी-माणगाव-दिघी पोर्ट, सातारा-अकलूज-लातूर आणि इंदूर-जामनेर-औरंगाबाद या रस्त्यांचेही सादरीकरण केले गेले होते. राज्याने एकूण 4 हजार किलोमीटर रस्ते हे राज्य महामार्गात परिवर्तीत करण्याची विनंती केंद्राकडे केली आहे.

निविदा संभ्रमजनक
‘न्हाई’ची प्रस्तावित योजना व प्रत्यक्ष काढलेल्या निविदा यावरून थोडा संभ्रम सध्या आहे. यातील सिल्लोड-अजिंठा-फर्दापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या 753-एफ टप्प्याचे 60.630 ते 99.660 अशा 39.03 किलोमीटर व पुढे फर्दापूर-जळगाव दरम्यान 99.66 ते 147.38 अशा 47.720 किलोमीटर टप्प्याचे चार पदरी राष्ट्रीय महामार्ग निकषानुसार पेव्ड शोल्डरसह (दुभाजक) दुपदरीकरण केले जाणार आहे.

शेगाव ते पंढरपूर रस्ता
औरंगाबाद जळगाव रस्त्यासोबत बुलडाणा ते अजिंठा, शेगाव ते पंढरपूर आणि हसनाबाद – राजूर – देऊळगावराजा या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे भूमिपूजनही गडकरी यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

निर्णय कशासाठी ?
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता
नाशिक, शिर्डी व पुण्याला जोडणाऱ्या रस्त्यांशी औरंगाबादेत संगम
प्रस्तावित नागपूर समृद्धी महामार्गाशी भिडणारा प्रमुख जोडरस्ता
आंतररराष्ट्रीय पर्यटनस्थळ असलेल्या अजिंठ्यासाठी सोयीचा
70 किलोमीटरवर औरंगाबाद विमानतळ व आता जळगावही

पुढे काय?
इंदूर-औरंगाबाद रस्ताही राष्ट्रीय महामार्ग घोषित होण्याची शक्यता
इंदूर-जामनेर-औरंगाबाद या रस्त्याच्या कामाला मिळणार गती
जळगाव विमानतळ कार्यान्वित होण्याला वेग येणार
अजिंठ्यासाठी जळगावात पर्यटन माहिती केंद्र

न्युमेरीक्स

45,000 – किलोमीटर राज्याच्या हद्दीतील राज्य व राष्ट्रीय महामार्गांची सध्याची लांबी

10,000 – किलोमीटर रस्ते राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गात उन्नत करण्यासाठी आढावा

4,000 – किलोमीटर रस्ते राष्ट्रीय महामार्गात उन्नत करण्याची राज्याची केंद्राकडे मागणी

गडकरींनी दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद व जळगावातील जाहीर कार्यक्रमात मराठवाडा, खान्देश व विदर्भाला जोडणाऱ्या 18 हजार कोटींच्या पुढील रस्त्यांच्या कामाबाबत आश्वासन दिले होते. जानेवारी 2016 मध्ये या कामांना सुरुवात होईल, असे तेव्हा सांगितले गेले होते. औरंगाबाद व जालना शहरातील सहा अंतर्गत जोडरस्ते केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) 38.45 कोटी खर्चून बांधण्याचेही जाहीर केले गेले होते.

महामार्ग – लांबी (किमी) – खर्च (कोटी)
औरंगाबाद-जळगाव 155 15
औरंगाबाद-नाशिक 183 1830
औरंगाबाद-शिर्डी 150 1500
औरंगाबाद-पैठण-तिसगाव 100 1000
औरंगाबाद-जालना-राजूर 100 1000
(सिल्लोड-चिखली जोड)
औरंगाबाद-जामनेर-बऱ्हाणपूर-इंदूर 401 4010
औरंगाबाद-जालना-परभणी 125 1250
खामगाव-धारूर-माजलगाव-कळंब-पंढरपूर-सांगोला 450 4500